मतांसाठी पैसे घेणाऱ्यास ‘फितूर’ ठरवण्याचा इशारा

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजे पैशांचा बाजार असतो. कोणता उमेदवार तगडा आहे, याकडे सर्वच मतदारांचे लक्ष लागलेले असते आणि उमेदवार देखील मतदारांची अपेक्षा लक्षात ठेवत आर्थिक तयारी करीत असतो. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडूनही अनेकांनी अशी अपेक्षा बाळगली होती, परंतु  पैसे घेऊन मतदान कराल तर ‘फितूर’ ठराल, असा धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह वरिष्ठ नेत्यांनी दिल्याने मोठी अपेक्षा ठेवून नागपुरात दाखल झालेले चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीचे मतदार काहीसे हिरमुसले.

गावाकडे परत जाताना आजची बैठक ‘आंबट’ ठरली, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. भाजपने या निवडणुकीत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी नागपुरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. येथे भाजपकडे बहुमत आहे. मात्र, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना अशा निवडणुकीतून पैशांची अपेक्षा असते.

आजवरच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर अशा निवडणुकीत आर्थिकदृष्टय़ा सबळ उमेदवार दिला जातो. यामुळे साहजिकच या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य काही अपेक्षा घेऊन नागपुरात दाखल झाले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या बौद्धिकमुळे भर उन्हाळ्यात ते गारेगार झाले. या जागेसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होत आहे. डॉ. रामदास आंबटकर यांच्या विरोधात काँग्रेसने वर्धेचे माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ यांना मैदानात उतरवले आहे.

मर्द मावळ्याचा नेता होण्यात सारस्य

काँग्रेसने उमेदवार आयात केला आहे. सराफ यांचे पुत्र राजेश सराफ हे वर्धा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत पैशाचा पूर वाहील आणि हात धुवून घेता येईल, अशा अपेक्षा मतदार बागळून आहेत. भाजप नेत्यांनी मतदारांच्या मनातील ही भावना ओळखून भाषणाच्या सुरुवातीलाच पैशाची अपेक्षा करू नका, जो पैसे घेऊन मतदान करेल, तो फितूर ठरेल. अशा फितुरांचा नेता होणे आम्हाला अजिबात आवडत नाही, तर मर्द मावळ्याचा नेता होण्यात आपल्याला अधिक सारस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबटकरांच्या वाहनात तुम्हीच  इंधन घाला

कोणत्याही सदस्यांचे काही काम असेल तर सांगा, ते केले जाईल, परंतु आपले उमेदवार आंबटकर यांच्याकडे कुणीही पैशाची मागणी करता कामा नये, अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारांचे कान उपटले. डॉ. रामदास आंबटकर मते मागण्यासाठी येतील. तेव्हा त्यांच्या त्यांना चहा पाजा आणि त्यांच्या वाहनात इंधन घाला, अशा सूचनाही केल्या.