म.रा. जोशी यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या संतांचे वाङ्मय आणि त्याचा भावार्थ ग्रंथसंपदेच्या रूपात उपलब्ध आहे. काळानुरूप नवीन पिढीला संत साहित्याची ओळख व्हावी आणि जगभरात ते पोहचण्यासाठी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्य संशोधक व संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. म.रा. जोशी यांना गडकरी यांच्या हस्ते रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, खा. विकास महात्मे, सांस्कृतिक संचानालयाच्या संचालिका मीनल जोगळेकर, सचिव शैलेश जाधव, गुरुप्रसाद पाखमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. संत साहित्य हे मनोरंजनाचे साहित्य नाही तर लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि मूल्याधिष्ठित सांस्कृतिक समाज निर्माण करणारे आहे. वेदकाळापासून विविध संतांची साहित्य संपदा ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. तिला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात संत साहित्य आहे, पण ज्या पद्धतीने डॉ. जोशी यांनी संत साहित्यावर संशोधन केले आहे, ते नवीन पिढीपर्यंत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले पाहिजे. यामुळे नवी पिढी संस्कारित होईल. जगभरातून मान्यता मिळेल इतकी ताकद आपल्या संत साहित्यात आहे. हा आपल्याला मिळालेला सांस्कृतिक वारसा आहे. त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करून सर्वसामान्य जनतेसमोर ते मांडण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. डॉ. जोशी यांनी वेगळा ठसा निर्माण करून संत साहित्याला वेगळी दिशा दिली, असेही नितीन गडकरी म्हणाले.सत्कार समारंभानंतर ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी प्रथमेश लघाटे, शरयू दाते, सोनाली दीक्षित आणि गुणवंत घटवाई यांनी अभंग सादर केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.

पालखी मार्गासाठी आठ हजार कोटी खर्च करणार

आषाढी एकादशीला मोठय़ा प्रमाणात वारकरी देहू आणि आळंदी येथून पायी वारी करीत पंढरपूरला जात असतात. या वारीचे वेगळे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे आठ हजार कोटी खर्च करून  देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर असा पालखीसाठी  रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या रस्त्यामुळे वारकऱ्यांना पावसाळ्यात त्रास होणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

साहित्य जपण्याची व संशोधनाची गरज – जोशी

सत्काराला उत्तर देताना डॉ. म.रा. जोशी म्हणाले, आपल्याकडे वेगवेगळ्या संतांचे आणि नाथसंप्रदायाचे साहित्य उपलब्ध आहे. वि.भि. कोलते यांच्यापासून प्रेरणा घेत संत साहित्याचा अभ्यास केला असून वेगवेगळ्या पंथ आणि संप्रदायाचे साहित्य जतन करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यावर संशोधन करण्याची आज खरी गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. मी आयुष्यात संत साहित्यावर बरेच लेखन व संशोधन केले आहे. या कार्याची पावती म्हणून शासनाने गौरव केला असल्याचे डॉ. जोशी म्हणाले.