नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार व माजी खासदार नाना पटोले हे दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार २५ मार्चला त्यांचे अर्ज दाखल करणार आहेत.

गडकरी हे सकाळी ११ वाजताच्या सुमारास संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत, तर पटोले हे दीक्षाभूमीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी नेत्यांच्या आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीला प्रारंभ केला आहे. गडकरी यांना नागपुरातून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे, पण अजूनतरी त्यांची उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही. येत्या काही दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होईल. भाजपतर्फे गडकरी २५ ला अर्ज  भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आज उल्हास शालिकराम दुपारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूर लोकसभेसाठी एकूण ८९ अर्ज खरेदी करण्यात आले. त्यापैकी दोन अर्ज दाखल करण्यात आले, तर रामटेक मतदारसंघातून ४९ व्यक्तींनी अर्ज खरेदी केले, पण एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.