News Flash

“संकट गंभीर, सगळ्यांनी संवेदनशीलता दाखवायला हवी”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन!

येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये परिस्थिती सामान्य होईल, अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे.

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्रात आणि देशभरात करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. त्यासोबतच ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसीचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सगळ्यांनाच आवाहन केलं आहे. “माझी एकच विनंती आहे. सध्या डॉक्टर, नर्स, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांनी सामाजिक संवेदनशीलता दाखवायला हवी. एकमेकांना मदत करायला हवी. संकट गंभीर आहे. त्याचसोबत इतरांना मदत करतानाच स्वत:ची काळजी देखील घ्यायला हवी. माझी अपेक्षा आहे की येत्या ३ ते ४ दिवसांत ही परिस्थिती सामान्य होऊ शकेल”, असं गडकरी म्हणाले आहेत. तसेच, उपचारांसाठी दाखल होणाऱ्या लोकांना देखील गडकरींनी यावेळी आवाहन केलं आहे.

भिलाईहून १४० टनांचा कोटा मिळणार!

नागपूर आणि विदर्भातील ९ जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी नितीन गडकरींनी दिली. “नागपूरला भिलाईहून १४० टनांचा ऑक्सिजनचा कोटा मिळाला आहे. भिलाईहून कोटा आणण्यासाठी आमच्याकडे खासगी कंपन्यांच्या गाड्या होत्या. त्या परत दिल्ली आणि छत्तीसगडला परत गेल्या आहेत. आता काही खासगी लोकांनी गाड्या दिल्या आहेत. नागपूरला २०० टन ऑक्सिजनची गरज आहे. जर भिलाईहून १४० टन पूर्ण ऑक्सिजन आणता आला, तर आम्हाला काही समस्या येणार नाही. आयनॉक्स कंपनी हवेतून ८० टन ऑक्सिजन तयार करते. भिलाईहून ऑक्सिजन आणण्यास उशीर होत होता. आता ऑक्सिजन वाहतूक करण्याचं कंत्राट खासगी कंत्राटदाराला दिलं आहे. गाड्या असताना त्याची वाहतूक वेगाने व्हायला हवी हे आव्हान आहे”, असं ते म्हणाले. मात्र, येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली आहे.

लोकांनीही समजून घ्यावं!

दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सामान्य जनतेला देखील आवाहन केलं आहे. “संकट गंभीर आहे. उद्यापासून ऑक्सिजनचं संकट राहणार नाही. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील. ऑक्सिजनचा पुरेसा साठा नाही म्हणून रुग्णांना रुग्णालयात दाखलच करून घेऊ नका, असं करता येणार नाही. पण लोकांही एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपण प्रतिकूल परिस्थितीमधून जात आहोत. आपल्याकडे ऑक्सिजन, औषध, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. थोड्याशा अडचणी येऊ शकतात. पण लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. कधी व्यवस्था पुरेशी असते तर कधी कमी असते. पण यामुळे कुणाचा जीव जायला नको, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे”, असं ते म्हणाले.

“..तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल!” मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर अजितदादांनी हाणला टोला!

उद्यापासून ३० हजार रेमडेसिविरचं उत्पादन!

“उद्यापासून वर्ध्यामध्ये ३० हजार रेमडेसिविरचं उत्पादन सुरू होईल. त्याचं वितरण नागपूर आणि विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये दिलं जाईल. महाराष्ट्रात देखील जिथे जिथे रेमडेसिविरची कमतरता असेल, तिथे त्या पुरवल्या जातील”, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 2:10 pm

Web Title: nitin gadkari on oxygen supply in maharashtra remdesivir shortage in nagpur pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 शासकीय रुग्णालयांत प्राणवायू प्रकल्प
2 प्राणवायू पुरवठा बंद केल्याने उत्पादनात घट
3 दैनिक करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट!
Just Now!
X