27 January 2021

News Flash

संघ विचाराला ‘मार्केटिंग’ची गरज – गडकरी

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला घडवण्यात त्यांच्या विचारांचा मोठा वाटा आहे.

नागपूर : दत्तोपंत ठेंगडी, यशवंतराव केळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत होते. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला घडवण्यात त्यांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. जगाला त्यांचे विचार आणि कार्यपद्धती दिशादर्शक ठरू शकते. मात्र, त्याचे ‘मार्केटिंग’ करण्यात आम्ही कमी पडलो. भविष्यात संघ विचाराला ‘मार्केटिंग’ची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

नागपुरात आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी उपस्थित होत्या. संघ आणि अभाविपमधील आठवणींना उजाळा देताना गडकरी म्हणाले, पहिल्यांदा मंत्री झाल्यावर मी कोटय़वधींच्या कामांबद्दल अनेक कार्यक्रमात सांगायचो. तेव्हा लोकांचा विश्वास बसत नसे. परंतु आता हे सर्व लोकांना दिसू लागले आहे. त्यामुळे आज देश-विदेशातील लोक माझ्या कामांविषयी आश्चर्याने विचारतात,

तेव्हा मी त्यांना तुम्हाला संघाची कार्यपद्धती माहिती आहे का, असा प्रतिप्रश्न करतो. मात्र, यातील अनेकांना संघ विचार आणि संघाच्या कार्यपद्धतीची माहिती नसते. त्यामुळे आपण आपल्या चांगल्या गोष्टींचे ‘मार्केटिंग’ करण्यात कमी पडतो हे प्रकर्षांने जाणवते, याकडे गडकरींनी लक्ष वेधले.

संघावर पुस्तक लिहिणार

आज जगाला दिशा देणारे विचार संघाकडे आहेत. अभाविपचे कार्य करीत असताना यशवंतराव केळकर, दत्तोपंत ठेंगडी, भाऊराव देवरस हे मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांचे कार्य आम्ही जवळून पाहिले. हे लोक ‘जिनियस’ होते. या लोकांकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच मला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. अभाविप, संघाची कार्यपद्धती, व्यक्ती निर्माण, समूह कार्य त्यांच्याकडून शिकता आले. मी लेखक नसलो तरी दोन इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. आता जगाला संघ विचार, कार्यपद्धतीची माहिती व्हावी म्हणून यासंदर्भातील पुस्तक मी स्वत: लिहिणार आहे, असेही गडकरींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 3:02 am

Web Title: nitin gadkari says sangh ideology needs marketing zws 70
Next Stories
1 शेतकरी आंदोलनामुळे विदर्भातील व्यापाऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान
2 भारतातून दोन छायाकल्प चंद्रग्रहणांचे दर्शन
3 फळे, भाजीपाला वाहतुकीमुळे रेल्वेला लाभ
Just Now!
X