केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती

राजकारण, धार्मिक आस्था आणि सामाजिक व आर्थिक प्रगती या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांची सरमिसळ होऊ नये. बुद्धिजीवी लोक सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी शंभर वर्षे डोळ्यासमोर ठेवून विचार करतात. राजकीय लोकांचे तसे नसते. ते  केवळ पाच वर्षांचा विचार करतात. निवडणूक आली की, घोषणा करतात. पक्षाच्या टोप्या घालतात. चहा-पाणी केले जाते. कार्यक्रमात टाळ्या वाजतात आणि नेते निघून जातात, असे स्पष्ट प्रतिपादन  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विदर्भ मुस्लीम इंटेलेक्चुअल्स फोरमच्या वतीने ‘मुस्लिमांचे प्रश्न आणि समाधान’ या विषयावर सदर येथील अंजुमन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आज रविवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अब्दुर रहमान, अ‍ॅड. फिरोदस मिर्झा, अब्दुल रौफ शेख, ख्वाजा बेग, डॉ. वजाहत मिर्झा होते.

या कार्यक्रमात प्रारंभी मुस्लिमांचे काही प्रश्न मांडण्यात आले. यासंदर्भात गडकरी म्हणाले, विरोधक मतांसाठी भाजपवर मुस्लीमविरोधी, अल्पसंख्याकविरोधी, असल्याचा प्रचार करतात. कारण त्याशिवाय या समाजाचे मते मिळणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असते. राजकारणातील सर्वात मोठे भांडवल भीती आहे. त्यामुळे मताच्या राजकारणासाठी भाजपला खलनायक म्हणून सादर  केले जाते. मात्र वास्तविकता वेगळी आहे. भाजप मुस्लिमांच्या विकास आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर भेदभाव करीत नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात इतर वक्त्यांकडून उपस्थित केलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दय़ाला गडकरी यांनी स्पर्श केला. राजकारण आणि धार्मिक आस्था महत्त्वाच्या बाबी आहेत, परंतु सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा  विचार केला जावा. समाजाला आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम करण्यावर भर असला पाहिजे. ज्या समाजाला राजकीय नेतृत्व मिळाले, त्या समाजात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झाल्याचे दिसून येत नाही. डॉ. अब्दुल कलाम यांना देशात सर्व जाती-धर्मात सन्मान आहे. तो त्यांना आरक्षण होते म्हणून मिळाला नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि गुणवत्तेमुळे मिळाला. विकासाचा आणि जाती-धर्माशी काही संबंध नाही. ज्या समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, तो समाज देखील आम्ही मागास आहोत, असे म्हणतो. राजकीय नेत्यांचा त्याच्या समाजाला कितपत लाभ झाला.  सामाजिक-आर्थिक प्रगती झाली का, असा सवालही त्यांनी केला.

माध्यमे माझ्या मागावरच

मी महत्त्वाचा राजकीय नेता असल्याने प्रसिद्धी माध्यमे माझ्या मागावर असतात. माझ्या वक्तव्यावर वृत्तवाहिन्यांवर दररोज चर्चा होते. जे मी बोललेलो नसतो ते देखील माझ्यावर खपवले जाते, असा आरोपही गडकरी यांनी केला.