शहरातील पाच हजारांवर खड्डे बुजवल्याचा दावा

नागपूर : मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पडतात पण नागपुरातील रस्त्यावर पाच-दहा वर्षांपासून खड्डे नाहीत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच केला. मग दरवर्षी महापालिका कोणते खड्डे बुजवते, असा सवाल आता विरोधी पक्षाकडून तसेच विविध संघटनांकडून केला जात आहे.

शनिवारी सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरण कार्यक्रमात बोलताना  गडकरी यांनी वरील वक्तव्य केले होते. त्यामुळे तेथे उपस्थित भाजपसह इतरही नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नागपूरमध्ये झालेल्या विकास कामांचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले, मुंबईत खड्डे आहेत, पण नागपुरात खड्डे नाहीत. येथील रस्ते चांगले आहेत, असा त्यांचा म्हणण्याचा रोख होता. वास्तविक दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतरही महापालिका हजारो खड्डे बुजवल्याचा दावा करते. यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी महापालिकेचे अधिकारी देतात व खड्डय़ांबाबत प्रशासन जागरुक असल्याचा दावा केला जातो. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत महापालिकेने ५ हजारांवर खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. जर नागपुरात खड्डे नाहीत तर महापालिका बुजवत असलेले खड्डे कोणते असा प्रश्न यातून निर्माण होतो. गडकरी यांच्या  प्रयत्नाने नागपुरातील बहुतांश प्रमुख रस्ते सिमेंटचे करण्यात आले. यामुळे खड्डय़ांचा त्रास निश्चितच कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. अनेक सिमेंट रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याने त्यावर सुद्धा खड्डे पडले आहेत. तेथे महापालिकेकडून डांबर टाकले जाते. बेसा पोलीस ठाण्याच्या समोरून जाणारा सिमेंट रस्ता त्याचे उत्कृष्ट  उदाहरण म्हणता येईल. रेशीमबाग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. सध्या खुद्द सिव्हिल लाईन्समधील डांबरी रस्ते  पूर्णपणे उखडले आहेत. आमदार निवासापुढील रस्त्यावरून दुचाकी चालवणे अवघड जावे अशी  स्थिती आहे. काही सिमेंट रस्त्यांचा दर्जा निश्चित चांगला असला तरी त्याची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.

जनमंचने सिमेंट रस्त्यातील गैरव्यवहाराबाबत आंदोलन केले  होते. कामाचे अंकेक्षण करावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र कंत्राटदारावर खापर फोडून प्रशासन मोकळे झाले होते.  सिटीझन्स फोरम या संघटनेनेही रस्त्यावरील खड्डय़ांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी ‘उंगली बताओ’ आंदोलन केले होते. सहाही विधानसभा मतदारसंघात फोरमच्या कार्यकर्त्यांनी एका दिवसात शंभर खड्डय़ांचे छायाचित्र काढून त्याकडे महापालिकेचे लक्ष वेधले होते, असे फोरमचे अभिजित झा यांनी सांगितले.

यासंदर्भात स्थानिक भाजप नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी सिमेंट रस्त्यांमुळे पूर्वीच्या तुलनेत खड्डे कमी झाल्याचा दावा केला. गडकरींच्या वक्तव्याचा शब्दश: अर्थ घेणे चूक आहे, पण सिमेट रस्त्यांमुळे नागरिकांची झालेली सोय दुर्लक्षित करण्यासारखी नाही, शिवाय महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरूच आहे.

असे असले तरी  आजही सर्वसामान्य नागरिक खड्डय़ांमुळे त्रस्त आहेत. ज्या सोनेगाव तलावाजवळ झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी वरील वक्तव्य केले त्या वस्तीतील रस्त्यांवरही खड्डे  आहेत. त्यामुळे गडकरी म्हणतात त्याप्रमाणे मुंबईत खड्डे  असतीलही, पण नागपूरही त्याला अपवाद नाही. कारण महापालिकेकडून अजूनही खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

गडकरींचे विधान वास्तविकतेपासून लांब

नागपुरात खड्डे नाहीत हे गडकरी यांचे विधान वास्तविकतेपासून दूर जाणारे आहे. त्यांनी अंतर्गत रस्त्यांवरून किंवा सीमावर्ती भागातून फिरावे, त्यांना किती खड्डे आहे हे दिसून येईल.

– प्रफुल्ल गुडधे,  वरिष्ठ नगरसेवक, काँग्रेस.

प्रशासनाचा दावा खोटा

नागपुरात खड्डे नाहीत, असे गडकरी म्हणत असले तरी वास्तविकता तशी नाही. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय खड्डे शोधून त्याचे निवेदन महापालिकेला दिले. अनेक रस्ते हे महापालिकेचे नाहीत असा दावा प्रशासनाने केला होता, खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने एका पावसातच खड्डे पुन्हा तोंड वर काढतात.

– अभिजित झा, सिटीझन्स फोरम.

वक्तव्याचा विपर्यास नको

गडकरी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये. सिमेट रस्त्यांबाबत त्यांचे म्हणणे होते. दीड वर्षांपासून करोनामुळे प्रशासनाने विकास कामांना कात्री लावली, त्यामुळे खड्डय़ांची कामेही मागे पडली. पण पुढच्या काळात शहर खड्डेमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, भाजप, महापालिका.

महापालिकेने बुजवलेले खड्डे

(ऑगस्ट महिना)

       झोन           खड्डे

लक्ष्मीनगर      ६९०

धरमपेठ          ४३०

हनुमाननगर     ३६०

धंतोली             ६५०

नेहरूनगर       ६६८

गांधीबाग       ३८०

सतरंजीपुरा      ४२९

लकडगंज       ३५०

आशीनगर      ७६५

मंगळवारी       ४७०