काँग्रेस अनु. जाती सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नंतर नितीन राऊत यांचीही पक्षातून हकालपट्टी होईल, अशी सर्वत्र चर्चा असतानाच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची पक्षाच्या अनुसूचित जाती सेलच्या  राष्ट्रीय अध्यक्षपदी  नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गटाला धक्का मानला जातो.

चव्हाण यांना प्रदेशाध्यपदावरून हटण्यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी  केली होती. हे  प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे दिसून आल्यावर विदर्भातील काही नेत्यांना सोबत घेऊन विदर्भ काँग्रेसची मागणी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात हे दोन्ही नेते अग्रेसर होते. याउलट नांदेड महापालिकेची एकहाती सत्ता मिळवून चव्हाण यांनी त्यांचे पक्षातील  स्थान बळकट केले  होते. त्यानंतर चव्हाण यांनी प्रदेश समितीवर जवळपास सर्व प्रमुख नेत्यांना घेतले. विविध जिल्ह्य़ातील ब्लॉकमधून  प्रतिधित्व दिले.

शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रलंबित ठेवली. तसेच नितीन राऊत यांना पक्ष संघटनेत कोणतेही पद न देता झुलवत ठेवले. त्यानंतर माजी सनदी अधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाकडून लढून दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे किशोर गजभिये यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला. त्यामुळे नितीन राऊत यांचे काँग्रेसमधील राजकीय अस्तित्व  धोक्यात आल्याचे सांगण्यात येत होते. काँग्रेसच्या दिल्लीतील अधिवेशनात देखील सहभागी होता आले नाही. या पाश्र्वभूमीवर राऊत यांना अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्याने राज्यातील काँग्रेसजणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपापासून चव्हाण आणि राऊत यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर आले होते. त्यानंतर राऊत हे सातत्याने चतुर्वेदी यांच्याशी मिळून चव्हाण विरोधात मोर्चेबांधणी करत होते. या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती स्थानिक काँग्रेसजण चव्हाण यांच्याकडे पोहोचवत होते. चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्यानंतर राऊत यांनी चतुर्वेदी यांना पक्षात परत घेण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यासाठी त्यांनी दिल्ली आणि मुंबईच्या अनेकदा वाऱ्या केल्या. काँग्रेसच्या अधिवेशनाच्या काळात ते दिल्लीत ठाण मांडून बसले होते. ते कधीही उघडपणे समोर आले नाही. त्यांनी माजी खासदार गेव्ह आवारी आणि तानाजी वनवे यांना समोर केले होते. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी मोहन प्रकाश यांच्याविरोधात लॉबिंग करत असल्याने चव्हाण त्यांच्यावर नाराज होते. चव्हाण यांनी त्यांच्याविषयी उघडपणे कटुता व्यक्त केली नाही, परंतु पक्षाच्या संघटनेपासून दूर ठेवले होते. तसेच राऊत यांनाही चतुर्वेदीप्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागेल, असे जवळजवळ ठरल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते ऑफ दी रेकार्ड सांगत होते. मात्र, अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्षपदाची जबाबादारी पक्षाने त्यांच्यावर टाकल्याने स्थानिक नेते अवाक् झाले आहेत.