महापालिका आयुक्तांचा निर्णय; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

नागपूर : मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा खर्च त्यांच्या मालकांकडून वसूल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. डेंग्यूची साथ पसरत असताना शहरातील मोकळे भूखंड हे कचराघर झाल्याचे वृत्त प्रथम ‘लोकसत्ता’ने प्रकाशित के ले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत, हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील विविध भागातील मोकळ्या भूखंडांवर  झाडे, गवत वाढले आहे. पाण्याची डबकी साचली आहेत. येथे मोठय़ा प्रमाणात डेंग्यू डासांची उत्पत्ती होते, याकडे लोकसत्ताने लक्ष वेधले होते. याची द खल घेत डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भूखंडावरील कचरा उचलण्याचा खर्च भूमालकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. डेंग्यूची वाढती साथ लक्षात घेऊन आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान  त्यांना  वस्तीलगत असलेल्या अनेक मोकळ्या भूखंडांवर कचरा व घाण साचल्याचे निदर्शनास आले.

संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. सध्या महापालिकेद्वारे घरोघरी डेंग्यू अळ्यांची तपासणी सुरू आहे. हे कर्मचारी  घरातील कुंडय़ा, कुलरची टाकी तसेच पाणी साचणाऱ्या जागांची पाहणी करतात.

त्यात लारवा अर्थात डेंग्यूअळी आढळून आल्यास फवारणी के ली जाते. शहरात एकू ण ३२ हजारांवर मोकळे भूखंड आहेत. त्यापैकी काही नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीचे आहेत.

मैदानात वाहने उभी करणाऱ्यांवरही कारवाई

मोकळ्या मैदानात वाहने उभी के ली जातात. पावसाळ्यात वाहनाच्या येण्या-जाण्यांमुळे तेथे खड्डे तयार होतात. त्यात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मैदानात  वाहने उभी करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व झोन  सहायक आयुक्तांना दिले.

आणखी ८३२५ घरांचे सर्वेक्षण

डेंग्यू नियंत्रण मोहिमेअंतर्गत बुधवारी शहरातील  ८६८३ घरांची तपासणी करण्यात आली. यापैकी  ४४५ घरांमध्ये दूषित पाणी आढळले. याशिवाय ११३ ताप असलेले रुग्ण आढळून आले. २०६ जणांच्या रक्ताचे नमुने  घेण्यात आले आहेत.  २५३३ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २५४  कुलर्समध्ये डासअळी आढळून आली.