आचारसंहितेपूर्वी महापालिकेचे अचाट धाडस;  विरोधकांच्या प्रस्तावांकडे मात्र दुर्लक्ष

नागपूर : निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीने दोन दिवसात तब्बल १२०० कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे, तिजोरी रिकामी असतानाही महापालिकेने हे अचाट धाडस केले आहे. या मंजूर कामांमध्ये भाजप सदस्यांच्या प्रस्तावांचेच प्रमाण जास्त  आहे. विरोधी पक्षातील काँग्रेसचे काही मोजके सदस्य वगळता इतर सदस्यांच्या फाईली तशाच मागे ठेवल्याने त्यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

गेल्या काही दिवसात महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे सत्तापक्षासह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांच्या विकास कामांच्या फाईल प्रलंबित होत्या. मात्र, राज्य शासनाकडून मिळालेला निधी, घेण्यात आलेले कर्ज आणि उत्पन्नाचा वाढता स्रोत बघता कंत्राटदारांची देणी देण्यासोबत सदस्यांच्या विकास कामांच्या फाईल मंजूर केल्या जात होत्या. आचार संहिता लागण्यापूर्वी या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष कुकरेजा यांच्यामागे सदस्यांचा तगादा लागला होता. तो लक्षात घेऊन स्थायी समितीने ५५ प्रस्ताव मार्गी लावत १२०० कोटींच्या कामांना मंजुरी दिली.

काँग्रेस आणि बसपा नगरसेवकांच्या विकास कामांचे प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर होत असले तरी प्रशासनाकडून त्याला मंजुरी दिली जात नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. कुकरेजा यांचा कार्यकाळ संपून प्रदीप पोहोणे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार सांभाळला आहे. आता लोकसभा निवडणूक होईपर्यंत कुठल्याही विकास कामांना मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे सदस्यांना किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

काँग्रेस नगरसेवकांच्या विकासकामांचे प्रस्ताव माजी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे मंजुरीसाठी दिले गेले, परंतु त्यावर विचार केला गेला नाही. जे प्रस्ताव मंजूर झाले त्यात भाजपने भेदभाव केला.  या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

– तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते

समितीकडे आलेल्या काँग्रेस सदस्यांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कुठलाही भेदभाव करण्यात आला नाही. काही त्रुटी असल्यामुळे दोन सदस्यांच्या फाईलवर निर्णय झाला नाही. १३०० कोटी रुपयाच्या विकास कामांना समितीच्या शेवटच्या बैठकीत  मंजुरी देण्यात आली आहे.

– वीरेंद्र कुकरेजा, माजी अध्यक्ष, स्थायी समिती.