स्वयंसेवी संस्थेच्या तपासणीत वास्तव उघड

नागपूर : करोना नियंत्रणासाठी काहीही न करणाऱ्या महापालिके चे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. शहरातील करोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील फोन घ्यावे लागू नये म्हणून तेथील कर्मचारी फोनचा रिसीव्हर उचलून ठेवतात. त्यामुळे तीन-तीन तास हे फोन लागत नाही. स्वयंसेवी संस्थेच्या पाहणीत हे उघड झाले असून याची तक्रार अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे असेल तर त्यासाठी महापालिके ने चोवीस तास सुरू असणारी हेल्पलाईन सुरू केली. यासाठी महापालिके ने पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती के ली आहे. फोनच्या दोन लाईन्स सुरू करण्यात आल्या आहेत.

गरजू रुग्णाचे नातेवाईक येथे मदतीसाठी फोन करतात. मात्र तो लागतच नाही. याबाबत तक्रार करूनही सुधारणा न झाल्याने सिटीझन्स फोरमचे प्रतिनिधी व नगरसेवक कमलेश चौधरी, माजी नगरसेवक वेदप्रकाश  आर्य आणि अनिल मच्छले यांनी नियंत्रण कक्षाची बुधवारी दुपारी पाहणी के ली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी फोनचे रिसीव्हर उचलून ठेवले होते. वारंवार सूचना करूनही कर्मचारी ते फोनवर ठेवत नव्हते. याचे छायाचित्र काढून प्रतिनिधींनी महापालिके चे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची भेट घेतली व त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, महापालिके च्या ज्या रुग्णालयात ऑक्सिजनची सोय असलेल्या खाटा आहेत तेथे येत्या चार दिवसात उपचार सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आर्य, चौधरी, निशा खान, संजय जयस्वाल यांच्यासह फोरमच्या इतर सदस्यांनी दिला आहे.

 

महापालिके च्या करोना नियंत्रण कक्षाला बुधवारी दुपारी आकस्मिक भेट दिली असता तेथील कर्मचाऱ्यांनी फोनचे रिसीव्हर बाजूला उचलून ठेवले होते. यामुळे येणारे फोन बंद होते. याची तक्रार आम्ही अतिरिक्त आयुक्तांकडे के ली.

– वेदप्रकाश आर्य, माजी नगरसेवक