रविनगरात रास्ता रोको; काचीपुऱ्यात बुलडोझर रोखले सहआयुक्तांना घेराव; हिंदुत्ववादी संघटना, ‘भाजप’ नगरसेवकांसह नागरिक रस्त्यावर

नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने सुरू केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाईला गुरुवारी हिंदुत्ववादी संघटना, ‘भाजप’ नगरसेवकांसह संबंधित विभागातील नागरिकांनी विरोध केला. काचीपुरा, रविनगर, नरेंद्रनगर रामदासपेठ या भागातील नागरिकांनी रस्ता रोको करुन  मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळे निर्माण केले आणि बुलडोझर रोखले. त्यामुळे कारवाईसाठी आलेल्या पथकाला हात हलवत परत जावे लागले.  दिवसभरात पथकाकडून अवघ्या एका धार्मिक स्थळाच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे शहरात वादंग निर्माण झाला आहे.

वाहतुकीस अडथळा न ठरणाऱ्या मंदिरांवरही कारवाई होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गुरुवारी रामदासपेठ परिसरातील चार मंदिरावर कारवाई करण्यासाठी पथक पोहोचले. मात्र, धर्मिक स्थळ बचाव संघर्ष समितीचे कार्यकते आणि त्या भागातील नागरिकांनी रास्ता रोको करुन कारवाईला विरोध केला. ‘भाजप’ नगरसेविका रूपा राय, संजय बंगाले, सुनील हिरणवार, निशांत गांधी यांच्यासह इतरही नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते.

रविनगरमध्ये नागरिकांनी मंदिर परिसरात बुलडोझरला प्रवेशबंदी केली. नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन अखेर हे पथक माघारी फिरले. रामदासपेठ काचीपुरा परिसरातही अशाच प्रकारे पथकाला परत जावे लागले. धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातठेले उभे करण्यात आले होते. येथेही नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. संतप्त जमावाने टायर जाळण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांना संतप्त नागरिकांनी घेराव घातला. कुठल्याही परिस्थितीत कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा ‘भाजप’ नगरसेवकांनी दिला. त्यामुळे कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधार प्रन्यासच्यावतीने १६ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार होती. मात्र, सोमलवाडातील एका धार्मिक स्थळावर कारवाई करता आली.

मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सोमलवाडा, भामटी आणि सोनेगाव या परिसरातील ‘नासुप्र’च्या जागेवर कारवाई केली जाणार होती. मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, अविनाश ठाकरे यांच्यासह ‘भाजप’च्या अनेक नगरसेवकांनी आणि परिसरातील नागरिकांनीही विरोध केला. नरेंद्रनगरमध्येही कारवाई करत असताना बुलडोझर रोखण्यात आला. मंदिर परिसरात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी भजने सादर करण्यात आली. काही युवकांनी नरेंद्र नगरकडून जाणाऱ्या पुलावर रस्ता रोको आंदोलन केले, त्यामुळे या भागातील वाहतूकही काही काळ थांबली होती.

नगरसेवकांकडून नियमभंग

अतिक्रमण कारवाईत अडथळा निर्माण केल्यास नगरसेवक अपात्र ठरण्याचा नियम आहे. मात्र, नागपुरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याच्या कारवाईस भाजप नगरसेवक विरोध करू लागल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.