सुटीच्या दिवशी महापालिकेची तत्परता
मुख्यमंत्र्यांचे समर्थक, भाजपचे नेते, नगरसेवक व इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सूरज लोलगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले असून ते थांबवण्यासाठी दडपशाहीचा वापर सुरू आहे. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे एक पथक उपोषण स्थळी गेले आणि परवानगी नसल्याने मंडप काढण्यास सांगितले. विशेष म्हणजे रविवारी सुटी असतानाही महापालिकेने दाखविलेली तत्परता हा चर्चेचा विषय आहे.
यादव यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्य़ांची नोंद आहे तसेच त्यांनी दहशतीचा वापर करून दोन झोपडपट्टय़ा रिकाम्या केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई करीत नाहीत, असा आरोप उपोषणकर्ते सूरज लोलगे यांनी केला आहे. त्याविरुद्ध ते संविधान चौकात शनिवारपासून उपोषणावर बसले आहेत.
रविवारी दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने त्यांना परवानगी न घेतल्याच्या कारणावरून मंडप काढण्यास सांगितले. त्यानुसार तो काढण्यात आला. दरम्यान, अनेक ठिकाणी अजूनही अतिक्रमण आहे. बर्डी व इतर वर्दळीच्या ठिकाणी फुटकळ विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटतात.
महापालिका कधीच कारवाई करीत नाही. मात्र रविवार असूनही केवळ मंडप काढण्यासाठी महापालिकेच्या पथकाने दाखविलेली तत्परता ही उपोषणकर्त्यांवर दबाव आणण्याचाच प्रकार असल्याची चर्चा आहे. मंडप काढल्याने सध्या लोलगे व त्यांचे समर्थक उघडय़ावरच उपोषणाला बसले आहेत.

दडपशाहीचा प्रकार
उपोषणासाठी शुक्रवारी परवानगीसाठी महापालिकेच्या धंतोली झोनमध्ये अर्ज केला होता. सोमवारी परवानगी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितले होते. त्यामुळे उपोषणस्थळी मंडप टाकण्यात आला. रविवारी सुटी असतानाही महापालिकेचे पथक दुपारी एक वाजता आले व परवानगी न घेता मंडप टाकल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला, मंडपात लावण्यात आलेले बॅनर्स त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. कारवाई होऊ नये म्हणून आम्ही स्वत:हून मंडप काढून टाकला, हा दडपशाहीचा प्रकार आहे.
– सूरज लोलगे, उपोषणकर्ते

परवानगी नव्हती
उपोषणकर्ते सूरज लोलगे यांनी मंडप उभारणीसाठी परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक गेले होते. त्यांनी स्वत:हूनच मंडप काढला.
– सुभाषचंद्र जयदेव, सहाय्यक आयुक्त, धंतोली झोन.