|| महेश बोकडे

मेयोचाही रुग्ण ठणठणीत; आता तिसऱ्या अहवालावर लक्ष

नागपूर : उपराजधानीत आढळलेले चारपैकी तीन रुग्ण आता बरे होण्याच्या मार्गावर आहेत. तिसऱ्याच्या तपासणी अहवालानंतर या सगळ्यांच्या उपचाराची नवीन दिशा निश्चित होईल. या  रुग्णांपैकी दुसरा अहवाल नकारात्मक आलेल्या मेयोच्या रुग्णाला डॉक्टरांकडून गरजेनुसार प्रतिजैविके दिली गेली. परंतु मेडिकलचा तीनपैकी दोन रुग्णाला एकही औषध देण्याची गरज भासली नाही. त्यामुळे लक्षणे नसलेल्याने विलगीकरणाचा नियम सक्तीने पाळल्यास तो घरीही बरा होऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञ देत आहेत.

खासगी डॉक्टरांकडून करोनाग्रस्तांवर उपचाराबाबत फारसा प्रतिसाद नाही. परंतु मेडिकल, मेयोतील शासकीय डॉक्टर पूर्ण क्षमतेने या रुग्णांना सेवा देत आहेत. ११ मार्चला उपराजधानीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला. मेयोत या रुग्णांवर उपचारा दरम्यान सुमारे तीन वेगवेगळे प्रतिजैविक औषध डॉक्टरांकडून दिले गेले. दुसऱ्या तपासणी अहवालात या रुग्णात करोनाचे विषाणू आढळले नसल्याने उपचाराची दिशा अचूक असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाच्या संपर्कातील तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. पैकी दोघांचा दुसरा तपासणी अहवालात नकारात्मक आला आहे.

या अहवालातून तिनही रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर दिसत आहे. दरम्यान, मेडिकलच्या एका रुग्णाला काही प्रमाणात प्रतिजैविक औषध देण्यात आले. परंतु इतर दोघांवर आहारासह इतर शारीरिक स्वच्छता आणि वैद्यकीय स्थितीवर बारीक लक्ष ठेवले गेले. या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, असे एकही लक्षण नव्हते.  त्यामुळे त्यांना कोणतेही प्रतिजैविक औषध न देता ते बरे झाले आहेत. या दोघांचीही तिसरी तपासणी येत्या एक ते दोन दिवसांत होईल. त्यांचे अहवाल नकारात्मक आल्यावर त्यांच्या छातीची क्ष-किरण तपासणी केल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयाबाहेर काही कालावधीसाठी विलगीकरणात ठेवले जाईल.  या यशस्वी उपचारासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी तर मेयोतील अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, उपअधीक्षक डॉ. सागर पांडे, औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते परिश्रम घेत आहेत. या वृत्ताला दोन्ही रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

विलगीकरण महत्त्वाचे

केंद्र व राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने नागरिकांना घरातच रहा, इतरांच्या संपर्कात येऊ नका. विदेशात प्रवासाचा इतिहास किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्ती असल्यास त्याने विलगीकरणात राहून आरोग्य विभागाला सूचना देण्याचे आवाहन केले जाते. विलगीकरणाचे नियम पाळल्यास रुग्ण बरे होऊ शकतात, हे मेडिकलच्या रुग्णांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

– डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल नागपूर</strong>