विदर्भ पुत्राबाबत अनास्था

संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे आणि विदर्भातील पहिले मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला प्रशासकीय यंत्रणेच्या शब्दांचा कीस पाडण्याच्या चार्तुयाचा फटका बसला. शासकीय निधीतून कोणत्या शीर्षांमधून पुण्यतिथीवर खर्च करावे हे स्पष्ट नसल्याचे सांगत कन्नमवार यांची पुण्यतिथी थातूरमातूर पद्धतीने ओटपण्यात आली.

कन्नमवार यांचा नागपूर विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाजवळ पुतळा असून हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्यांची पुण्यतिथी येते. यावर्षी विधिमंडळ सचिवालयाचे अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

कन्नमवार यांची २४ नोव्हेंबरला पुण्यतिथी आणि १० जानेवारीला जयंती महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने साजरी केली जाते. परंतु सार्वजनिक बांधकाम खाते या कार्यक्रमांवर खर्च करताना उपकाराची भाषा करते. त्यामुळे बेलदार समाज संघर्ष समितीने यावर्षी जानेवारी २०१७ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

जयंत पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यानंतर विधान मंडळ सचिवालयाचे अतिरिक्त सचिव रवींद्र जगदाळे यांनी सामान्य प्रशासन, स्थापत्य आणि विद्युत खात्याला पत्र पाठवून या कार्यक्रमावरील खर्च शासकीय निधीतून करण्याचे आदेश १३ जानेवारील २०१७ ला दिले. त्यात स्पष्टपणे कार्यक्रमाप्रसंगी शासकीय निधीतून प्रकाश व्यवस्था, ध्वनीक्षेपक, मंडप, फुलांची सजावट व मान्यवरांसाठी ३०० ते ४०० खुच्र्या इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेशात नमूद केले. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणताही पत्र व्यवहार न केल्याने बेलदार समाज संघर्ष समिती व दादासाहेब कन्नमवार प्रतिष्ठान यांनी जयंत पाटील यांना कळवले. सार्वजनिक बांधकाम खात्याला ७ नोव्हेंबर १७ ला स्मरण पत्र देण्यात आले. ही प्रत कार्यकारी अभियंता अविनाश गुल्हाने यांना देण्यात आली. त्यानंतरही ऐनवेळेपर्यंत तयारी करण्यात आली नव्हती. पुन्हा त्यांना आठवण करून दिल्यानंतर साफसफाई करून देण्यात आली. मात्र, पत्रात नमूद करण्यात आल्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली नाही.

या कार्यक्रमासाठी कोणत्या शीर्षकामधून खर्च करावा हे माहीत नाही, असे गुल्हाने यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. कन्नमवार सी.पी.अँड बेरारमध्ये सार्वजनिक मंत्री होते. त्यावेळेस रवीनगर कर्मचारी वसाहत उभारण्यात आली. पुढे ते आरोग्य मंत्री झाले व संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले. परंतु आज त्यांच्या पुण्य स्मरणासाठी आयोजित कार्यक्रमावर पैसा कुठून खर्च करायचा असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो आणि सचिवालयाचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहात नाहीत. ही अनास्था विदर्भाचेच सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री असताना घडावे, हे आश्चर्य आहे. या संदर्भात विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे दीर्घ सुटीवर असल्याने याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यासंदर्भात चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.

बांधकाम खात्याची भूमिका नाही

विधान भवन परिसरात अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन विधिमंडळ करत असते. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याची काहीच भूमिका नाही. शहरातील पुतळ्याची साफसफाई करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असते. दुसरे म्हणजे कोणत्या शीर्षकाखाली खर्च करावे, असे आपण म्हटलेले नाही. -अविनाश गुल्हाने, कार्यकारी अभियंता, विधानभवन परिसर,सार्वजनिक बांधकाम.