* आरोग्य विभागाला अंशत: दिलासा * सलग तीन दिवसांत २९ रुग्णांची नोंद

नागपूर : उपराजधानीत १२ ते १४ एप्रिल दरम्यान सलग तीन दिवसांत २९ करोनाग्रस्त आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते. परंतु बुधवारी दिवसभरात एकही नवीन रुग्ण नोंदवण्यात आला नसल्याने आरोग्य विभागासह शहरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

उपराजधानीत करोना विषाणूच्या पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च २०२० रोजी करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू कमी-अधिक रुग्ण आढळत असल्याने ८ एप्रिल २०२० पर्यंत ही संख्या १९ वर पोहचली. ९ एप्रिलला शहरात एकही रुग्ण आढळला नाही. परंतु त्यानंतर १० एप्रिलला ६ रुग्ण, ११ एप्रिलला २ रुग्ण, १२ एप्रिलला १४ रुग्ण, १३ एप्रिलला ६ रुग्ण आणि १४ एप्रिलला तब्बल ९ रुग्ण अशा एकूण पाच दिवसांत ३७ रुग्णांची नोंद झाली. हे सर्वच रुग्ण मरकजशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित होते.

दरम्यान, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  बहुतांश रुग्ण आधीच विलगीकरणात असल्याचे सांगितले होते.

मरकज आणि दिल्लीशी संबंधित व्यक्तींची यादी मिळताच  महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोखमीतील आणि कमी जोखमीतील व्यक्तींचा शोध घेत त्यांना सक्तीने आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा आणि सिंबॉयसीसच्या वास्तूत विलगीकरणात ठेवले होते. त्यामुळे कालांतराने  सकारात्मक आलेल्या अहवालात सगळेच व्यक्ती विलगीकरणातील निघाले. त्यामुळे  कोरनाचा सामाजिक प्रसाराचा धोका कमी झाला.

दरम्यान हे रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे पुढे आल्यावर तातडीने त्यांना विलगीकरणात घेण्यापूर्वी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही विलगीकरणात घेण्यात आले आहे.

मेडिकलची करोना तपासणी ठप्प!

मेडिकल येथे करोना तपासणीशी संबंधित रसायन संपल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे बुधवारी येथे करोनाची एकही तपासणी झाली नाही. एकीकडे शहरात रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे मेडिकलची तपासणी ठप्प झाल्याने करोनाबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थापनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेडिकल प्रशासनाकडून मात्र त्यावर बोलण्यास नकार देण्यात आला. एका अधिकाऱ्याने मात्र  अडचण असली तरी मेडिकलचे सगळे नमुने तपासले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

नवीन ९ संशयित दाखल

मेडिकल (४ रुग्ण) आणि मेयो (५ रुग्ण) या दोन्ही शासकीय रुग्णालयांत बुधवारी करोनाची लक्षणे असलेले एकूण ९ नवीन रुग्ण  दाखल झाले. त्यांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावरच आजाराची माहिती कळेल. दरम्यान, मेयोच्या करोनासंबंधित बाह्य़रुग्ण विभागात दिवसभरात ९२ जणांची तपासणी केली गेली.