धंतोली परिसरातील वाहनतळाची समस्या अधिकच गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहतूक पोलीस आणि महापालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता अनेक २० मार्ग ‘नो पार्किंग झोन’ करण्यात आले असून ३ रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. त्यासाठी नागपूर पोलिसांतर्फे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येईल.

धंतोली परिसरात मोठय़ा प्रमाणात रुग्णालये आहेत. याशिवाय मंगल कार्यालये आणि अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे धंतोली नागरिक मंडळाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून परिसरातील वाहतूक कोंडीचा विषय उचलला होता. त्यावर न्यायालयाने महापालिका आणि वाहतूक पोलिसांना धंतोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी धोरण निश्चित करून १९ रस्ते ‘नो पार्किंग’ जाहीर केले आहे, तर तीन रस्ते एकेरी वाहतुकीसाठी असतील.

या वाहनांना सूट

शासकीय वाहने, पोलीस विभागाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि अधिकृत ऑटो थांबे यांना या अधिसूचनेतून वगळण्यात आले आहे. ही अधिसूचना ३ जून ते २ जुलै दरम्यान लागू राहील. या अधिसूचनेवर काही आक्षेप असल्यास वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात कळवावे.

या रस्त्यांवर आता नो पार्किंग

१) राजकमल अपार्टमेंट ते गोरक्षण सुरक्षा भिंत मार्ग

२) सुनील पान मंदिर ते आरती प्रोव्हिजन्स सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत

३) भारूका भवन ते डॉ. पेंडसे कॉर्नर

४) न्यूरॉन रुग्णालय ते अ‍ॅड. लाला भवन

५) भिवापूरकर चेंबर ते धंतोली गार्डन टी-पॉईंट

६) मिश्रा हाऊस ते साक्षी अपार्टमेंट

७) श्रीकृष्ण रुग्णालय ते काँग्रेसनगर-रहाटे कॉलनी

८) डॉ. अमोल महाजन रुग्णालय ते रॉलका हॉटेलपर्यंत

९) डॉ. ढोबळे ते विजयानंद सोसायटी मार्ग

१०) न्यूरॉन रुग्णालय ते जनता चौक

११) एलआयसी बिल्डींग ते गोखले हाऊस, जोग हाऊस (पी-१, पी-२ पार्किंग)

१२) गोखले हाऊस ते अमरज्योती अपार्टमेंट

१३) एच.पी. गॅस गोदाम ते काँग्रेसनगर

१४) पत्रकार भवन ते मेहाडिया चौक (पे अ‍ॅण्ड पार्क वगळून)

१५) मेहाडिया चौक ते राजकमल अपार्टमेंट (दुचाकीसाठी एका बाजूने पार्किंग उपलब्ध)

१६) धंतोली गार्डनच्या चहुबाजूने कारसाठी सिंगल लेन पार्किंग

१७) मेहाडिया चौक ते होमगार्ड टी-पॉईंट (पी-१ए आणि पी-२ए पार्किंग)

१८) अरुणा पॅलेस ते विठ्ठल अपार्टमेंट

१९) मेहाडिया चौक ते होमगार्ड कार्यालयदरम्यान गार्डनच्या पूर्व बाजूस दुचाकीसाठी सिंगल लेन पार्किंग

२०) जनता चौक ते रहाटे कॉलनी

एकेरी वाहतुकीचे रस्ते

१) सराफा कोर्ट ते सिहो रुग्णालय

२) वरंभे रुग्णालय ते सिल्व्हर पॅलेस

३)  राजकमल कॉम्प्लेक्स ते अमरज्योती कॉम्प्लेक्स