वनविभागाकडून चक्क पावसाळी अधिवेशनाचा दाखला 

नागपूर : मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या कर्मचाऱ्याला चक्क पावसाळी अधिवेशनाचा दाखला देत करोनाकाळात कामावर बोलावण्याचा प्रकार वनखात्यात उघडकीस आला आहे. शासन एकीकडे आजारी कर्मचारी, गर्भवती यांना करोनाकाळात कामावर बोलावू नका, असे स्पष्टपणे सांगत आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम वनखात्याकडून के ले जात आहे.

करोनाचा विळखा वाढत असताना राज्य शासनाने सरकारी व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे गणित आखून दिले. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची १५ टक्केच उपस्थिती असावी, असे शासनाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद आहे. यातून आजारी कर्मचारी, गर्भवती  यांना कामकाजातून सवलत देण्याचेही निर्देश आहेत. मात्र, वनखात्याच्या मुख्यालयात सुरुवातीपासून शासनाच्या या आदेशाला के राची टोपली दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. जुलै महिन्यात एका आजारी लेखापालाच्या करोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर कर्मचारी उपस्थितीचा हा प्रकार पहिल्यांदा समोर आला.

त्यानंतरही मुख्यालयातील गर्दी ओसरली नाही. आणखी एक कर्मचारी बाधित झाल्यानंतर मात्र प्रशासन हादरले आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे कागदोपत्री गणित आखून दिले. मात्र, याच मुख्यालयातील एका विभागात बदलीच्या निमित्ताने पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भरणा असल्याने गर्दी होतीच. त्यानंतर आणखी एका महिला कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. या घटनांनी कर्मचारी हादरले असताना आता एका मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या लेखापालाला कामावर बोलावण्याचा प्रकार समोर आला आहे. लेखापाल एम.के . वाघमारे यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे. त्या अनुषंगाने करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन निर्णयानुसार कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, असा विनंती अर्ज त्यांनी २३ जुलैला सादर के ला. मात्र, पावसाळी अधिवेशनामुळे शासकीय कामाचा निपटारा वेळीच करणे आवश्यक असल्याने कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सवलत देता येणार नाही, असे सांगत वन विनियमन विभागाचे उपवनसंरक्षक एस.एस. दहिवले यांनी त्यांचा विनंती अर्ज फे टाळून लावला. विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनाचा अद्याप पत्ता नसताना त्याची रूपरेषा आखायसाठी एका आजारी कर्मचाऱ्याला कामावर बोलावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी करोनामुळे मृत्यू पावलेला लेखापालही आजारी होता आणि आजारपणातच त्याला कामावर बोलावण्यात आले होते.