महामेट्रोने पर्यावरणपूरक मेट्रो चालवण्याचा निर्धार व्यक्त केला, पण वृक्ष पुनर्रोपणाचा त्यांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे. पटवर्धन शाळा परिसरात मेट्रोतर्फे करण्यात आलेले झाडांचे पुनर्रोपण अपयशी ठरले. आता कडबी चौक स्थानक परिसरात पुनर्रोपणापूर्वीच वृक्ष मृत्युपंथाला लागले आहेत.

मेट्रो चालवण्यासाठी मोठी झाडे तोडण्याऐवजी त्याचे पुनर्रोपण करून ते पुन्हा जगवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार कडबी चौकातील १२ झाडे ‘रुट बॉल’ प्रणालीद्वारे उपटून हिंगणा मार्गावरील ‘लिटिल वूड विस्तार’ येथे लावण्यात येणार असल्याचे पूर्व-पश्चिम मार्ग प्रकल्पाचे कार्यकारी संचालक महादेव स्वामी यांनी चार दिवसांपूर्वी सांगितले. कडबी चौक परिसरात आंबा, बदाम, कडूलिंब, अशोका, मुंगना अशा बारा प्रजातीच्या झाडांच्या पुनर्रोपणाचे काम मॉर्निग हॉर्टिकल्चर प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. त्यानुसार या परिसरातील एका झाडाचे पुनर्रोपण झाले. उर्वरित ११ झाडे अजूनही परिसरात तसेच खूण करून ठेवलेले आहेत. ज्यातील एक आंब्याचे झाड चार दिवसांपासून उखडून तसेच पडले आहे. एकदा झाड जमिनीपासून उखडल्यानंतर त्याचे त्वरित रोपण करायला हवे. मात्र, संचालकांच्या म्हणण्यानुसार झाडांची मुळे, फांद्या कापल्या तरी ते झाड पाच दिवसांपर्यंत तसेच राहू शकते. त्यावर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर ते झाड मृत पावत नाही, तर क्रेनच्या सहाय्याने ते दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित केले जाते.

हैदराबादच्या एजन्सीला काम

हैदराबादच्या एजन्सीला पुनर्रोपणाचे काम दिले आहे. त्यांनी पुण्याला ३०० झाडांचे पुनर्रोपण केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, साधारण पाच दिवसांपर्यंत पुनर्रोपण करता येते. सर्व झाडे काढण्यापेक्षा एक-एक झाड काढून त्याचे प्रत्यारोपण करणे सुरू आहे.