रुग्णाच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांचीही भटकंती

महेश बोकडे, नागपूर</strong>

मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटीसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालयात आजही उपाहारगृह नाही. त्यामुळे येथील रुग्णांच्या नातेवाईकांना सायंकाळनंतर भोजनासाठी भटकंती करावी लागते. येथील बहुतांश रुग्ण शहराबाहेरचे असतात. त्यांना स्थानिक हॉटेल्सची माहिती नसल्याने नाश्त्यासह जेवणासाठी अवास्तव खर्चही करावा लागतो.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांसह तपासणीच्या बहुतांश सुविधा असल्याने मेडिकल, मेयोसह राज्यातील इतर भागातील रुग्णालयांतून रोज मोठय़ा संख्येने हृदय, हृदय शल्यक्रिया, मेंदू, मूत्रपिंड, यकृत, गॅस्ट्रोइंट्रोलॉजी, श्वसनरोगासह इतरही विभागाचे अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी येतात. उपचार घेणाऱ्यांत मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांची संख्या मोठी आहे, तर डागा रुग्णालयातही रोज प्रसूतीसाठी शहरातील विविध भागांसह शेजारच्या जिल्ह्य़ातूनही गर्भवती महिला मोठय़ा संख्येने उपचारासाठी येत असतात.

 

निकषांना बगल

प्रत्येक शासकीय रुग्णालयांत नातेवाईकांच्या जास्त वर्दळीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यास एक उपाहारगृह असायला हवे, परंतु सुपरस्पेशालिटी, डागा, मनोरुग्णालयात या निकषांना बगल दिली जात आहे, तर मेडिकल, मेयोत डॉक्टरांसाठी उपाहारगृह असले तरी ते नातेवाईकांसाठी हक्काचे नाही. त्यामुळे काही नातेवाईक तेथे भूक भागवत असले तरी काही भीतीपोटी बाहेर जाऊनच अल्पोहार व जेवण करणे पसंत करतात. मेडिकलला काही उपाहारगृह आहेत, परंतु तेथे चहा-नाश्त्याव्यतिरिक्त जेवणाची सोय नाही, हे विशेष.

‘‘सुपरस्पेशालिटीत रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या बघता उपाहारगृहाची गरज आहे. बचत गटाच्या मदतीने हा प्रकल्प येथे कार्यान्वित करणे शक्य आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल.’’

– डॉ. मिलिंद फुलपाटील,विशेष कार्य अधिकारी, सुपरस्पेशालिटी रुग्णालय.

सुपरच्या नातेवाईकांना दोन किमीचा फेरा

मेडिकल प्रशासनाकडून सुपर आणि मेडिकलला जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. सायंकाळी हे द्वार बंद झाल्यावर सुपरमधील रुग्णांच्या नातेवाईकांना भूक लागल्यास त्यांना तुकडोजी पुतळा चौकातून दोन चौक ओलांडून दोन ते तीन किमीचा फेरा मारून मेडिकल चौकात येऊन पोटाची भूक शांत करावी लागते.