तपासणीबाबत नियमावलीच नाही; क्रेझी केसलच्या घटनेनंतर विषय पुन्हा ऐरणीवर

नागपूर : उपराजधानीसह राज्यभरात अनेक जलतरण तलाव बांधण्यात आले आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षा तपासणीबाबत अद्यापही काही नियमावली नाही. अग्निशमन व आणीबाणी विभागाकडे मागणी झाल्यास तपासणी होते, परंतु तपासणी करताना नेमके काय करावे, याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने हा विभागही संभ्रमात आहे. क्रेझी केसलच्या जलतरण तलावात अक्षय आणि सागर या दोन तरुणांच्या मृत्यूनंतर हा विषय नव्याने ऐरणीवर आला आहे.

उपराजधानीत महापालिका, नागपूर सुधार प्रन्याससह काही सार्वजनिक संस्था व खासगी व्यक्तींनी जलतरण तलाव तयार केले आहे. जिल्ह्य़ात काही खासगी कंपन्यांनीही नफा कमवण्यासाठी वॉटर पार्क उभारले आहेत. या तलावांच्या बांधकामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बांधकाम विभागासह इतर काही यंत्रणांकडून परवानगी हवी असते, परंतु जलतरण तलावाची खोली, नकाशासह इतर कामाबाबत अद्याप नियम नाहीत.

जलतरण तलावात पोहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तेथे काय उपाय असावे, याबाबतही विशिष्ट दिशानिर्देश नाहीत. दरम्यान, कुणा संस्था वा व्यक्तीने जलतरण तलावाच्या सुरक्षा प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभागाकडे अर्ज केल्यास तपासणी केली जाते, परंतु अग्निशमन विभागाने अर्जदाराला काय तपासून कशाबाबत  स्पष्ट सूचना करायच्या, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यानंतरही उपराजधानीतील अग्निशमन विभाग पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तेथे लाईफ सेव्हिंग जॅकेट, हवा भरलेले लाईफबॉय टय़ूब, बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी आवश्यक जीव रक्षकांची संख्या, पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बांबू आणि दोरी, धोकादायक स्थळावर जाण्यास निर्बंध घालण्यासाठी लोखंडी साखळीचे सुरक्षा कवच लावण्यासह इतर काही सूचना लेखी स्वरूपात दिल्या जातात.

अग्निशमन विभागाकडे १५ तलावांचीच नोंद

महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, विविध सामाजिक संस्था, मोठमोठे हॉटेल्स, उच्च उत्पन्न गटातील अनेक खासगी व्यक्तीच्या निवासस्थानासह इतरही काही ठिकाणी लहान-मोठे जलतरण तलाव आहेत, परंतु त्यातील केवळ १५ तलावांचीच नोंद अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाकडे आहे. यातील सात तलाव हे एकटय़ा सिव्हिल लाईन्स परिसरात आहेत.

यासाठीही तपासणी गरजेची

जलतरण तलावातील पाण्याचे र्निजतुकीकरण केले जाते का, ठरावीक काळानंतर तलावातील पाणी बदलण्यात येते का,  जीवरक्षकांची संख्या पुरेशी आहे का, प्रशिक्षित जीवरक्षक आहेत काय, तलावातील फरशा आणि आसपासच्या परिसराची दुरुस्ती- डागडूजी केली जाते का, यासारख्या अनेक गोष्टींचा आढावा तलावाची नित्याने तपासणी केल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तलावांची नित्याने तपासणी गरजेची आहे.

जलतरण तलाव परिसरात आवश्यक सुरक्षेच्या उपायाबाबत स्पष्ट नियम व सूचना नाहीत, परंतु महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाकडून कुणाची मागणी होताच जलतरण तलावाची पाहणी करून आवश्यक उपाय व सूचना संबंधितांना केल्या जातात. कुणाचाही जीव धोक्यात येऊ नये हा आमचा उद्देश आहे.

      – राजेंद्र उचके, अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग, नागपूर.