केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली होती
मध्य भारतात इबोला, मर्ससह दुर्मिळ आजाराचा प्रकोप झाल्यास उपचाराकरिता नागपूर मेडिकलमध्ये केंद्र सुरू करण्यात येणार होते. आता हा प्रस्ताव बारगळला असून या भागात या आजाराची साथ पसरल्यास उपचाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.
दक्षिण अफ्रिकेतील काही देशांमध्ये वर्ष २०१४-२०१५ मध्ये इबोला या दुर्मिळ आजाराने थैमान घातले होते. त्यावर लसीकरण वा उपचारही उपलब्ध नसल्यामुळे हजारो नागरिक या आजाराने दगावले होते. हा आजार इतर देशात पसरत असल्याचा धोका ओळखून जागतिक आरोग्य संघटनेकडून संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला होता. हज यात्रेकरूंच्या माध्यमातून हा आजार देशात पसरण्याची भीती लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूरसह सात आंतरराष्ट्रीय विमानतळांना हजहून परतणाऱ्या आजारी प्रवाशांची विमानतळावरच शासकीय यंत्रणेकडून तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या आजारावर तातडीने उपचार करता यावे म्हणून नागपूरच्या मेडिकलसह देशाच्या विविध भागात उपचार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार तत्कालीन आरोग्य सचिव सुजाता सौनिक यांनी मेडिकलची पाहणी केली होती व प्रस्तावाला मंजुरीही दिली होती. प्रकल्पाकरिता केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार होता, परंतु इबोलाचे रुग्ण आपल्याकडे आढळले नसल्यामुळे हा प्रस्तावच थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे. आजाराचा प्रकोप झाल्यास त्यावर शासकीय रुग्णालयात उपचाराची यंत्रणाच उपलब्ध नाही. खासगी रुग्णालये असले रुग्ण घेत नाहीत, हे येथे उल्लेखनीय.
भविष्याकरिता केंद्र गरजेचे
मध्य भारतात इबोला, मर्स, झिकासह विविध दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार शक्य नसल्यामुळे शासकीय रुग्णालयांतच ही सुविधा उपलब्ध असावी. त्याकरिता केंद्राने सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सुरू करण्याला मंजुरी दिली होती. मात्र, पुढे काहीच झाले नाही. भविष्याचा विचार केला तर अशा केंद्राची गरज आहे.
– डॉ. प्रमोद रक्षमवार, राज्य सरचिटणीस, मॅग्मो.
First Published on June 6, 2017 2:46 am