|| राखी चव्हाण

नीरीतर्फे २७ शहरात तपासणी; प्रदूषण कमी करण्यासाठी संशोधन करणार

ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादा दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेच ओलांडली जाते असे नाही तर, त्याव्यतिरिक्तही यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत.  नागपुरातील नीरी या संस्थेने या संदर्भात केलेल्या तपासणीत  नागपूरचा क्रमांक खालचा असला तरी  शहरात सुरू असलेल्या मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. नीरीने केलेल्या सर्वेक्षणात बांधकामाच्या ठिकाणी होणारे ध्वनीप्रदूषण कमी अधिक होत असले तरीही वाहतूक सिग्नलचे थांबे आणि वर्दळीच्या ठिकाणी होणारे ध्वनिप्रदूषण चिंता निर्माण करणारे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहने ध्वनी आणि वायू प्रदूषणासाठीसुद्धा कारणीभूत आहेत. शहरातल्या अनेक भागांमध्ये मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशावेळी हॉर्नचा वापर अधिक केला जातो. वाहतूक नियमानुसार  जोरात हॉर्न  वाजवता येत नाही.  वाहनांना मॉडीफाईड सायलेन्सर, प्रेशर हॉर्न्‍स लावणे बेकायदेशीर आहे. तरीही जे वाहनधारक बुलेट किंवा तत्सम वाहने खरेदी करू शकत नाही, ते त्यांच्या दुचाकीत ही यंत्र लावतात. यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. मोटारवाहन नियमानुसार कमाल ध्वनी सीमा ८० डेसिबल आहे. मॉडीफाईड सायलेन्सर किंवा प्रेशर हॉर्न्‍समुळे ती १०० डेसिबलपेक्षाही अधिक होते. युवकांमध्ये सध्या अशा दुचाकींचे वेड असून या वाहनांची संख्या वाढत आहे.त्यामुळे ही ध्वनिप्रदूषण वाढत आहे.

बांधकामामुळे होणारे ध्वनिप्रदूषण स्थिर नसले तरीही त्यामुळे होणारा त्रास हा अधिक आहे. शहरात आजपर्यंत इमारतींच्या बांधकामामुळे ध्वनिप्रदूषण होत होते. आता त्यात मेट्रोचे काम आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची भर पडली आहे. रामदासपेठ, धरमपेठ, सदर, जयताळा, सिव्हिल लाईन्स परिसरात रात्री देखील बांधकाम सुरू असल्यामुळे त्रस्त नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात धोरण तयार करण्यास सांगितले. राज्य सरकारने नीरी या पर्यावरण संस्थेकडे हे काम सोपवले. २७ शहरांची यादी सरकारने नीरीला सोपवून ध्वनिप्रदूषणाची स्थिती जाणून घेण्यास सांगितले. नीरीने राज्यातील दहा शहरांच्या ध्वनिप्रदूषणाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप केले, तर उर्वरित शहरांचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. ज्या दहा शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप पूर्ण झाले आहे, त्यात नागपूरचा देखील समावेश असून सध्यातरी नागपूर हे कमी ध्वनिप्रदूषण असणारे शहर ठरले आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील वर्दळीची ठिकाणे आणि वाहतुकीच्या थांब्यावरील ध्वनिप्रदूषण चिंताजनक असल्याचा निष्कर्ष नीरीच्या पाहणीतून निघाला आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात प्रधान वैज्ञानिक डॉ. रितेश विजय यांच्या नेतृत्वात नीरीची चमू ध्वनिप्रदूषणाच्या मोजमापाचे कार्य करीत आहे. सखोल अभ्यासानंतरच प्रत्येक शहराच्या ध्वनि प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तयार होईल.  यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी उपाय योजनासुद्धा सूचवल्या जाणार आहेत.  हे काम पूर्ण झाल्यानंतर ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सोपवली जाणार आहे.

ध्वनिप्रदूषण पातळी

  • कल्याण-डोंबिवली आणि नाशिक – ८६ डेसिबल
  • औरंगाबाद – ८५ डेसिबल
  • मुंबई, पुणे व सोलापूर – ८४ डेसिबल
  • कोल्हापूर – ८३ डेसिबल
  • ठाणे – ८२ डेसिबल
  • नागपूर – ७४ डेसिबल

‘‘शहरातील काही क्षेत्रे अशी आहेत ज्याठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी खूप जास्त आहे. मात्र, सध्याच ती क्षेत्र सांगता येणार नाहीत. बांधकामाच्या ठिकाणी असणारे ध्वनिप्रदूषण जास्त असले तरी ते तेवढय़ापुरतेच असते. याठिकाणी ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी-जास्त होत आहे. मात्र, वाहतूक सिग्नल्स आणि वर्दळीच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. न्यायालयाने यावर मात करण्यासाठी संशोधन करण्यास सांगितले आहे. २७ शहरांची ध्वनिप्रदूषण मोजणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. आता फक्त ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी  कोणते तंत्रज्ञान वापरायचे, जनजागृती करायची का, यावर संशोधन सुरू झाले आहे.’’   – डॉ. राकेश कुमार, संचालक, नीरी