कुख्यात अरुण गवळीच्या बॅनरखाली रॅली

प्रजासत्ताक दिन देशभर साजरा झाला. यात नागपूरकरही मागे नाहीत. परंतु प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना नागपूरकरांनी दुचाकीवर धोकादायकपणे वाहन चालवून आणि डीजे लावून रस्त्यावर ताल धरून हुल्लडबाजीचे दर्शन दिले.  काहींनी कुख्यात गुंडांच्या बॅनरखाली रॅली काढून देशभक्तीच्या नावाखाली हिडीस प्रदर्शन केले. त्यामुळे नागपूरकर तरुणाला देशभक्तीचा विषमज्वर झाला होता? असा सवाल जनमानसातून विचारण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे रक्षण करणाऱ्यांच्या बलिदानाची आठवण करण्यात येते. त्यांना आदरांजली वाहिली जाते. नागपूरकरांनीही हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा केला. मात्र, दुसरीकडे काहींनी कुख्यात ‘डॉन’ डॅडी ऊर्फ अरुण गवळी याच्या बॅनरखाली धरमपेठ परिसरातून रॅली काढली. यात रितेश बैसवारे हत्याकांडातील आरोपी अश्वीन तुरकेल, कुख्यात संजय फातोडेचा मुलगा आणि गवळी याचे समर्थक हिरणवार कुटुंबांच्या सदस्यांनी ही रॅली काढल्याची माहिती समोर येत आहे.

या रॅलीत अनेक तरुणांचा सहभाग होता. रॅली तिलकनगर, धरमपेठ भागातून निघाली. डीजेच्या कर्णकर्कश गोंगाटात हिडीस नृत्य करीत फिरत होता. वाहतुकीच्या सर्व नियमांचा धाब्यावर बसवून अनेक तरुण कारच्या टब व बोनटवर बसून देशभक्तीचे प्रदर्शन करीत होते. चित्रपटांच्या गाण्यांवर हातात तिरंगा घेतलेली तरुणाई कोणत्या देशभक्तीचे प्रदर्शन करीत होती, असा सवाल परिसरातील नागरिक विचारत होते. शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा अरुण गवळी तरुणाईचा आदर्श कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसून रॅली

शहरातील अनेक भागांमध्ये तरुणाईने दुचाकी आणि कारची रॅली काढली आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले. बुलेट वाहनचालकांनी आपल्या गाडीतून फटाके फोडून लोकांच्या कानठळया बसविल्या. गाडय़ांच्या बोनटवर बसून अतिशय वेगाने व धोकादायकपणे वाहने चालवून इतरांचे जीव धोक्यात आणण्याचे प्रकार घडले. तसेच जगनाडे चौकातून ‘बॅड बॉईड’चे टी-शर्ट परिधान करून अनेक तरुणाईने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून रॅली काढली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील त्यांनी फटाकेही फोडले. मात्र, पोलीस मूकदर्शक बनले होते, असा आरोप होत आहे. हुल्लडबाजीतून देशभक्ती कशी व्यक्त होते? असा सवाल सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.

साडेतीन हजारांवर कारवाई

२६ जानेवारीला पोलिसांनी धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या २८६ जणांवर कारवाई केली. यात ५८ बुलेट वाहनचालकांचा समावेश आहे. याशिवाय सिग्नल तोडणारे २५, हेल्मेट न घालणारे ६०, दारू पिऊन वाहन चालविणारे ३६,  विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ३१, सीट बेल्ड न लावणे २८, वाहन चालविताना मोबाईल वापरणे १८, एकाच वाहनावर तिघेजण प्रवास करणे ६४ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच ३ हजार २५७ लोकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ई-चालान कारवाई करण्यात आली. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या ‘बुलेट राजां’ची वाहने जप्त करण्यात आली आणि पालकांना घेऊन आल्याशिवाय ती वाहने सोडण्यात आली नाही. पालकांचे ओळखपत्र तपासूनच वाहने सोडण्यात आली. यामुळे अनेक पालकांना त्यांची मुले घराबाहेर काय करतात, याची माहिती मिळाली. अनेक पालकांनी पोलिसांचे आभारही मानले.

स्मार्तना पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त.