|| महेश बोकडे

मेडिकलमध्ये अंडीऐवजी उसळ, डागात शेंगदाण्याचे लाडू!

शाकाहारी अन्न चांगले की मांसाहारी, या मुद्यावर दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत, परंतु रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या गर्भवती महिला, क्षयरुग्ण, मानसिक रुग्ण, हाडांच्या रुग्णांना मांसाहार फायद्याचा असल्याने त्यांना तो मिळावा, असे आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु मेडिकल, मेयो, डागा, प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये अघोषित मांसाहार बंदी लागू झाली असून काही रुग्णालयांत अंडे देणेही बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका विशिष्ट आजाराच्या रुग्णांना बसत आहे.

मेडिकल, मेयो, डागा, प्रादेशिक मनोरुग्णालय येथे एकेकाळी जास्त प्रथिनांची गरज असलेल्या रुग्णांना विकल्पानुसार आठवडय़ात एक ते दोन वेळा मटण किंवा अंडी दिली जात होती. परंतु आता सर्वच रुग्णालयांमध्ये मटण बंद झाले आहे. डागा, मेडिकल, मेयोत अंडीही थाळीतून बाद झाली आहेत. मेयोत केवळ क्षयरुग्णांना अंडी दिली जातात. मांसाहारातून शरीराला प्रथिने, आवश्यक अमिनो अ‍ॅसिडस् मिळतात. चिकनमधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ मिळतात. १०० ग्रॅम चिकनमधून ३१ ग्रॅम प्रथिनांचा शरीराला लाभ होतो. मांसाहारातून फॉस्फरस, कॅल्शियमसारखे आवश्यक  खनिज पदार्थ मोठय़ा प्रमाणात मिळतात. परिणामत: ज्येष्ठ व्यक्तींसह अस्थिरुग्णांच्या हाडांचा ठिसूळपणा कमी होतो. तरुणांची हाडे बळकट होतात, लहान मुले, किशोरावस्थेतल्या युवक युवतींच्या हाडांची वाढ होते. मांसाहारातील सेलेनियम हा घटक सांधेदुखीच्या त्रासाला नियंत्रित करतो.

शाकाहारात काही जीवनसत्वांचा अभाव

‘‘आयुर्वेदाने शाकाहाराचा पुरस्कार केला असला तरी गरजेप्रमाणे मांसाहाराचाही वापर करण्याचा आग्रह केला आहे. शाकाहारात काही जीवनसत्वे कमी असून मांसाहारात ते मिळतात. मांसाहार पचण्यास जड आहे. रुग्णांच्या पचनशक्ती आणि क्षमतेनुसार तो द्यायला हवा. अस्थिरुग्ण, गर्भवती, क्षयरुग्ण, मानसिक रुग्णांना मांसाहार फायद्याचा आहे, परंतु ते जास्त शिजवायला हवे. शिवाय त्यात तेल, मिठ, तिखट कमी हवे. या आहाराची मात्राही निश्चित हवी. मांसाहाराचा अतिरेक हानीकारक आहे.’’   – डॉ. मोहन येंडे, आयुर्वेद तज्ज्ञ.

रुग्णांकडून एकही तक्रार नाही

‘‘शासनाच्या सूचनेनुसार रुग्णांना मेडिकलमध्ये आवश्यक दर्जेदार आहार दिला जातो. मांसाहार ऐवजी उसळसह इतर पदार्थातून आवश्यक प्रथिनांची मात्रा दिली जाते. रुग्णांकडून आहाराबाबत एकही तक्रार नाही. चांगल्या आहारामुळे रुग्ण लवकर  बरे होण्यास मदत होत आहे.’’    – डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

संशोधनानुसार मांसाहार फायद्याचा

‘‘नवी दिल्लीतील एम्समध्ये झालेल्या संशोधनानुसार, शाकाहारी महिलांच्या तुलनेत मांसाहारी महिला अधिक सुदृढ असतात. मांसाहार करणाऱ्या महिलांमध्ये हृदयाशी संबंधित आजार, हायपरटेंशन, कॅन्सर, यकृताशी संबंधित आजार कमी दिसतात. त्यातुलनेत शाकाहारी महिलांमध्ये आजाराचे प्रमाण अधिक आहेत. गर्भवती महिलांनी अंडय़ावरील पांढरा भाग खाणे चांगले असून त्यातून त्यांना योग्य प्रमाणात प्रथिने मिळतात. त्याचा होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.’’    – डॉ. मनाष पाटील, अध्यक्ष, ऑरेंज सिटी होमिओपॅथी असोसिएशन.