ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांची भावना

मंगेशकर घराण्यातील आम्ही सर्व बहिणी व भाऊ संगीताच्या क्षेत्रात असलो तरी आम्हा कुणालाच ‘लता दीदी’ मात्र होता येणार नाही, असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केले.

हार्मोनी इव्हेंटच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमाशी बोलत होत्या. लता दीदी मोठी बहीण असली तरी तिचे गाणे म्हणजे जगातील आश्चर्य आहे. त्यामुळे पुढचे शंभर वर्षे लता मंगेशकर निर्माण होऊ शकत नाही. दीदीचे वय झाले पण आजही ती गाते त्यावेळी तिच्या आवाजातील तोच सुरेलपणा कायम जाणवतो. पूर्वीचे संगीत शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन तयार केले जात असल्यामुळे त्यावेळच्या गाण्याची गोडी आजही कायम आहे. काव्य आणि त्या काव्यास संगीताचा साज असा वेगळा बाज त्याला होता. मात्र आजच्या संगीताबद्दल न बोललेले बरे. नवीन पिढीतील गायकांमध्ये बुद्धिमत्ता व नवीन काही तरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्यांना योग्य दिशा मिळत नाही. अनेक चांगल्या गाण्याचे रिमिक्स केले जात असून त्याचे सौंदर्य नष्ट केले जात आहे. मुळात रिमिक्स हा प्रकार संगीत क्षेत्रात चुकीचा आहे असेही त्या म्हणाल्या. रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अनेक कलावंत समोर आले. मात्र, त्यांना मिळणारी प्रसिद्धी ही त्यांच्यासाठी या वयात जास्त धोकादायक आहे. शास्त्रीय संगीत शिकणारी नवीन पिढी समोर येत असताना त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. माझ्या आयुष्यात सर्वात वाईट प्रसंग म्हणजे माझ्या आईचे निधन आणि सर्वात चांगली घटना म्हणजे लता दीदीला मिळालेला भारतरत्न पुरस्कार आहे असेही त्या म्हणाल्या.

प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ज्यांना व्यक्त व्हायचे आहे, त्यांनी व्हावे मात्र काहीही चुकीच्या मार्गाने बोलू नये. गेल्या पाच वर्षांत मला कुठेच अहिष्णुता दिसून आली नाही. पुढे कुठले सरकार येणार, हे माहिती नाही असेही उषा मंगेशकर म्हणाल्या.

पोट्रेट काढणे हा माझा छंद

माझी आई चांगली चित्रकार होती त्यामुळे मलाही लहानपणापासून चित्रकलेचा छंद होता. दीनानाथ दलाल यांच्याकडे शिकायला गेले. त्यानंतर रघुवीर मुळगावकर यांच्यासोबत काही दिवस काम केले. पोट्रेट काढणे हा माझा छंद आहे. शिवाजी गणेशन यांच्या वाढदिवसाला मी काढलेले पोट्रेट भेट दिले आणि त्यांना ते आवडले होते. गाण्यासोबत चित्रकलेचा छंद मी अनेक वर्षे जोपासला मात्र, काही वर्षांत त्यापासून दूर झाले आहे.