नागपुरात विमानाचे सुटे भाग तयार; २०२२ पर्यंत पूर्ण विमान तयार होणार

नागपूर : फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार नागपुरात सुरू झालेल्या दसाल्ट रिलायन्स एअरोस्पेस या कारखान्यात ‘फॉल्कन २०००’ या विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (एअरक्राफ्ट नोझ कोन) तयार झाले आहे. हे कॉकपिट उद्या शुक्रवारी विशेष विमानाने फ्रान्सकडे रवाना करण्यात येत आहे.

भारताने राफेल या युद्ध विमानांची खरेदी केली आहे. त्यावेळी झालेल्या करारानुसार, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एव्हिएशन आणि राफेल बनवणारी दसाल्ट कंपनी यांनी दसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस या  संयुक्त कंपनीची स्थापना केली आहे. या संयुक्त कंपनीने नागपुरातील मिहान-सेझमध्ये कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यात फॉल्कन या प्रवासी विमानाचे सुटे भाग जोडण्याचे काम सुरू झाले आहे. विमानाचे सुटे भाग वेगवेगळ्या कंपन्यांकडून आणून येथे एकत्र (असेंबल) करण्यात येत आहेत. मिहानममधील या कारखान्यात एप्रिल २०१८ पासून काम सुरू झाले आहे. आज ‘फॉल्कन २०००’ या बिझनेस जेट विमानाचे ‘एअरक्रॉप्ट नोझ कोन’ तयार झाले आहे. ते उद्या, शुक्रवारी फ्रान्सला पाठवण्यात येत आहे.

या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतकुमारन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिट नोझ कोनला शुक्रवारी फ्रान्सकडे पाठवण्यात येईल. तेथे फॉल्कन विमान सुसज्ज केले जाते. नागपुरात लवकरच सुटे भाग एकत्र जोडून कॉकपिट तयार करण्यात येणार आहे.

मिहान-सेझमधील कारखान्यातून २०२२ पर्यंत पूर्ण फॉल्कन विमान तयार केले जाईल. नागपुरात या कारखान्यात सध्या एक हँकर आहे. त्यात नोझ कोनचे उत्पादन सुरू आहे. याशिवाय येथे आणखी दोन हँकर तयार करण्यात येत आहेत.

भारताने हवाई दलासाठी फ्रान्सकडून ५९ हजार कोटी रुपये किमतीची ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार २३ सप्टेंबर २०१६ केला आहे. या करारानुसार भारतात तयार झालेले सुटे भाग दसाल्ट कंपनीला घ्यावे लागणार आहेत.

राफेलची निर्मिती नाहीच

दसाल्ट रिलायन्स एअरोस्पेसच्या मिहान-सेझमधील कारखान्यात २०२२ पर्यंत ६५० जागांइतकी रोजगार निर्मिती होईल, असे कंपनीचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने सुसज्ज स्थितीत मिळणार आहेत. त्यामुळे सध्यातरी  राफेल युद्ध विमान नागपुरात तयार होणार नाहीत.