पोलीस आयुक्तांची सूचना

नागपूर : शहरातील टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली वाहनांची संख्या बरीच होती. या पार्श्वभूमी वर पोलिसांना बंदोबस्त करताना  अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक व्यवसायांना देण्यात आलेली सवलत कमी करावी, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना केली.

पोलिसांकडून आज शहरातील ३३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९९ ठिकाणी व ८ सीमांवर नाकाबंदी लावण्यात आली. त्याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांवर गस्त घालण्यात आली. बाजारपेठ बंद असल्याने गर्दी कमी होती. पण, त्यानंतरही रस्त्यांवर वाहनांनी ये-जा  बरीच  होती. हा अनुभव बघून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सायंकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, बांधकाम क्षेत्र व उद्योग सुरू असल्याने कर्मचाऱ्यांची गर्दी रस्त्यांवर दिसत असल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय भाजी व मांस विकत घेणाऱ्यांचेही प्रमाण बरेच होते. त्यामुळे भाजी व मांस विक्रेत्यांची वेळ दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठरवण्यात यावी व इतर व्यवसायांना देण्यात आलेली सवलतही कमी करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खासगी कार्यालयांना आकस्मिक भेट

शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी त्यांच्याकडून करोना नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांकडून आकस्मिक भेट देण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करून पंधरा दिवसांकरिता ते कार्यालय बंद करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद

टाळेबंदीच्या काळात वाहनांचा वेग प्रचंड राहतो व उड्डाणपुलांवर ही गती नियमापेक्षा अधिक असते. त्यामुळे पर्यायी रस्त्यांची सुविधा असणाऱ्या ठिकाणी उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्ते मोकळे असल्याने उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद केल्यास फारसा परिणाम पडणार नाही, असेही पोलीस आयुक्त म्हणाले.

६३८ वाहने जप्त

टाळेबंदीमध्येही विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांची ६३८ वाहने पोलिसांनी सोमवारी जप्त केली. मुखपट्टी न घालणाऱ्या ८६१ जण, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न बाळगणारे ३६३ आणि इतर १४ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले.