News Flash

राज्य सरकार, ‘एमपीएससी’ला नोटीस

परीक्षा केंद्र बदलासंदर्भात एका आठवडय़ात उत्तर दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

संग्रहित छायाचित्र

राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे केंद्र विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार बदलण्याची मुभा देण्यात यावी, या मागणीसह दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. तसेच एका आठवडय़ाच्या आत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

‘स्टुडन्ट्स राइट्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने ही याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमोर सुनावणी झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. आधी ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. करोनामुळे  परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेकरिता ३७ जिल्ह्य़ांतील केंद्रांचे पर्याय देण्यात आले. मात्र, बहुतांश विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे स्थायी असल्याने ते पुणे परीक्षा केंद्राची निवड करतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने पुणे परीक्षा केंद्र निवडणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती.

अडचण काय? : करोनामुळे उमेदवार आपापल्या घरी परत गेले. सार्वजनिक वाहतूक बंद आहे. परिणामी, दूरच्या परीक्षा केंद्रात जाणे शक्य नाही. करोनाचा फटका केवळ पुणे जिल्हा नाही तर, संपूर्ण राज्यातील उमेदवारांना बसला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा मोठय़ा शहरांची निवड केली आहे. या शहरात राहून परीक्षेची तयारी करणारे उमेदवार सध्या आपापल्या घरी आहेत. त्यांनाही या काळात लांबच्या परीक्षा केंद्रात येणे शक्य नाही. शेकडो उमेदवार दुर्बल घटकातील आहेत. मोठय़ा शहरांमध्ये कोरोनाचीही झपाटय़ाने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता संपूर्ण राज्यातील उमेदवारांना त्यांच्या सुविधेनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची अनुमती देण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:11 am

Web Title: notice to the state government mpsc abn 97
Next Stories
1 ऑनलाइन प्रवेशामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे भविष्य धोक्यात
2 बायोमेट्रिक मशीनचा वापर निलंबित करण्याची मागणी
3 सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची औषधांच्या चिठ्ठय़ांनी बोळवण!
Just Now!
X