१३ गुन्ह्य़ांची कबुली

नागपूर : पन्नासपेक्षा अधिक दुचाकी चोरी करणारा कुख्यात दुचाकीचोर अखेर प्रेम प्रकरणामुळे सापडला. त्याने आतापर्यंत १३ ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली असून त्याच्याकडून ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वरूप नरेश लोखंडे (२६) रा. श्रीनगर, अजनी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणारा सराफा व्यापारी भारत ऊर्फ बंटी उदयभान गलबले (३५) नरसाळा रोड, बँक कॉलनी यालाही अटक करण्यात आली. मागील काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र पोलिसांनी घेतले होते. त्यात अनेक ठिकाणी स्वरूपसारखा चोरटा दिसून येत होता. पोलीस स्वरूपचा शोध घेत होते. तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता स्वरूप हा अजनी हद्दीतील एका तरुणीच्या प्रेमात असून १२ जून २०१९ ला त्याने तिला पळवून नेले होते. तो तिच्यासह दाभा परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली.  पोलिसांचे पथक दाभा परिसरात गेले. पोलिसांना पाहून स्वरूपने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि अटक केली. त्याने बजाजनगर येथून ४, अजनी, बेलतरोडी, नंदनवन, धंतोली, पाचपावली, जरीपटका, लकडगंज येथून प्रत्येकी एका महिलेचे दागिने लुटल्याची कबुली दिली.

त्याचप्रमाणे अजनी आणि बेलतरोडी येथून दोन वाहने चोरून नेली होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीची दोन वाहने, ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तू असा ३ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती रोशन यांनी यावेळी दिली.