18 October 2019

News Flash

शांततापूर्ण निवडणुकीसाठी कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार

निवडणूक शांतपणे पार पडावी म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहितीही भरणे यांनी दिली.

पोलीस उपायुक्त नीलेश भरणे

लोकसत्ता कार्यालयातील सदिच्छा भेटीत पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची माहिती

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. उपराजधानीतील निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. निवडणुकीच्या काळात पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी असते. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा भंग, आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते. निवडणूक काळात काही राजकीय पक्ष गुंडांच्या आधारे वस्त्यांमध्ये दहशत पसरवतात असा जुना अनुभव आहे. ही बाब लक्षात घेऊन अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी दिली.

आज शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. विशेष शाखा, परिमंडळ-४ आणि वाहतूक विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी भरणे यांच्यावर विश्वास दाखवत गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवली. पोलीस दलात गुन्हे शाखा अतिशय महत्त्वाची शाखा आहे. विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी ‘लोकसत्ता’ भेटीत अनेक मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली. भरणे म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. याचे श्रेय नागपूर पोलिसांना द्यावे लागेल. हल्ली अल्पवयीन मुलांकडून गुन्हे करवून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘केअर’ उपक्रम सुरू करण्यात आला. यातून मुलांना समुपदेशन करण्यात येते. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या मुलांचे क्रिकेट सामने घेण्यात आले. शाळकरी व महाविद्यालयीन मुलांचे अंमली पदार्थाचे सेवन समाजासाठी चिंतेची बाब असल्याने त्यांच्यात छात्र पोलिसिंगच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस विभागाशी जुळल्यानंतर मुलांमधील व्यसनाधीनता कमी होईल व समाजातील गुन्हेगारांचीही पोलिसांना माहिती मिळेल. सध्या निवडणुकीचे वारे सुरू आहेत. राजकीय पुढारी आणि गुन्हेगारांचे संबंध हा नवीन विषय नाही. त्यामुळे मतदारांना धमकावण्यासाठी किंवा समाजात दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने अपहरण, खंडणी मागणे, जुगार, दारू तस्करी, अंमली पदार्थ तस्कर, झोपडपट्टीतील गुंडांच्या वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. निवडणूक शांतपणे पार पडावी म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहितीही भरणे यांनी दिली.

गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

एप्रिल २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान गुन्हे शाखेने ५३८ गुन्हे उघडकीस आणले. यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, दरोडय़ाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, चोरीचा प्रयत्न, वाहन चोरी, सोनसाखळी चोरीचा समावेश आहे. या गुन्ह्य़ांमध्ये ९३५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या काळात १४० अवैध दारू विक्रेते, १४९ जुगार अड्डे, १० हुक्का पार्लर, ३८ क्रिकेट सट्टा, १३ पिस्तूल व बंदूक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थाची तस्करी व विक्री करणाऱ्या ५५ जणांवर कारवाई करून ७८ आरोपींना अटक करण्यात आली. ‘ड्रग फ्री सिटी’ करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची आहे. दोन कोटी ७४ लाख ७४ हजार ३९५ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

हवाला, दारू तस्करांवर विशेष नजर

निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही उमेदवारांकडून पैसे व अवैध दारू वाटली जाते. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विशेष पथकांमध्ये पोलीस असतात. त्याशिवाय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार हवालाच्या माध्यमातून पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणारे व दारूबंदी असलेल्या चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्य़ात दारूची तस्करी करण्यांवर विशेष नजर असणार आहे.

जनसंपर्काचा फायदा

पोलीस हे जनतेसाठी आहेत. पोलिसांच्या वर्दीला घाबरून अनेक लोक दूर पळतात. पण, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी शहरात अनेक वष्रे काम केलेले आहे. त्यांचा नागपुरात प्रचंड जनसंपर्क आहे. शिवाय मी नागपूरकर असल्याने मला ओळखणारे खूप आहेत. कोणत्याही परिसरात कोणतीही घटना घडल्यास किंवा अवैध धंदे सुरू असल्यास लोक ताबडतोब परिचयातील अधिकाऱ्यांना कळवतात. या जनसंपर्काचा फायदा होतो.

First Published on March 16, 2019 12:24 am

Web Title: notorious criminals for peaceful elections