१३ गुन्हे नावावर असलेल्या गुन्हेगाराबरोबर नेत्यांच्या छायाचित्रांनी नवा वाद
संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याची भाषा करणे वेगळे आणि खरोखरच त्या दिशने पावले उचलणे वेगळे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यापासून या दोन्ही बाबी एकाच वेळी करणे अवघड ठरले आहेत. पक्ष किंवा सत्ता कोणाचीही असो, राजकारण्यांशी गुन्हेगारांचा सलोखा कायम राहिला आहे. एकीकडे गुन्हेगारांबाबत कठोर भूमिका घेण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत थाटात छायात्रिचे काढून घ्यायची, असा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात उघड झाला आहे. ही सर्वपक्षीय गुंडप्रेमाची बाब व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे उघड झाली असून कुख्यात गुंडांना आशीर्वाद तरी कोणा-कोणाचा, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. या कुख्यात गुंडांशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगून या नेत्यांनी हात झटकले असले तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाच कसा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
गृहखाते सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच नागपुरात संघटित गुन्हेगारीचे प्रस्थ वाढल्याने सर्वाधिक टीकेचे लक्ष्य तेच ठरले. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा संकल्प जाहीर केला. शहरातील बडय़ा गुन्हेगारांवर मोक्काची कारवाईही केली. त्याचवेळी ज्यांच्यावर पोलिसांनीच मोक्का लावला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक भाजप आणि काँग्रेस नेत्यांची छायाचित्रे व्हायरल झाल्याने गुन्हेगारांशी त्यांचे संबंध किती खोलवर आहेत, हे उघड झाले आहे.
‘डॉन’ संतोष आंबेकर टोळीचा सदस्य व मोक्काचा आरोपी युवराज माथनकरसोबत एका छायाचित्रात फडणवीस आहेत. दुसऱ्या छायाचित्रात बावनकुळे यांनी त्याच्या खांद्यावर ‘हात’ही ठेवलेला आहे. भाजप नेते व बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती नगरसेवक मुन्ना यादव आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचीही माथनकरसोबत छायाचित्रे आहेत. फडणवीस व ठाकरे यांनी गुंडाशी आपले संबंध नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरताना कोणीही छायाचित्रे काढून घेतात, असे सांगून आपले हात झटकले आहेत. अर्थात गृहमंत्री असूनही १३ गुन्हे केलेला आपल्याच शहरातला गुंड मुख्यमंत्र्यांना कसा माहीत नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
पालकमंत्री बावनकुळे यांच्याशी मात्र वारंवार संपर्क साधून व भ्रमणध्वनीव्दारे संदेश पाठवूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

कोण हा माथनकर?
युवराज माथनकरविरुद्ध २००१ पासून अजनी, अंबाझरी, सोनेगाव, धंतोली, सदर आणि सीताबर्डी या पोलीस ठाण्यांतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत. खून, चोरी, मारहाण, सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे, शासकीय कामात अडथळा, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावे नष्ट करणे आदी गुन्ह्य़ांचा यात समावेश आहे.

राजकीय पुढाऱ्यांचे जीवन सार्वजनिक असते. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना किंवा कुणाच्या घरी जाताना तेथे कोण उपस्थित आहेत, याची कल्पना नसते. सार्वजनिक जीवनात अनेकजण पुष्पगुच्छ देतात आणि मोबाइलवरून छायाचित्रे काढून घेतात. अशांवर नियंत्रण आणणे शक्य नसते. शिवाय, अशावेळी त्यांची ओळखही विचारता येत नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री