दोघांना अटक, इतरांचा शोध सुरू

नागपूर : परिसरातील वर्चस्व आणि टोळीयुद्धातून कुख्यात अंकित ऊर्फ अम्मू राजू धकाते (२४) रा. पाचपावली याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रोशन चिचघरे (२२) आणि नितीन ऊर्फ मच्छी निमजे यांना अटक करण्यात आली आहे.

अंकुश चिचघरे, सचिन चिचघरे, राहुल मौदेकर आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे.   परिसरातील अवैध धंद्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आरोपीही प्रयत्न करीत होते. पण, अंकितच्या आवाजाशिवाय परिसरात काहीच चालत नव्हते. याचा द्वेष आरोपींच्या मनात होता.

शिवाय अंकित हा पोलिसांनाही माहिती पुरवतो, अशी शंका आरोपींना होती. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अंकित हा पटवी गल्ली परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला गाठले व सत्तुर, बल्ली व गुप्तीने हल्ला केला. चेहऱ्यावर अनेक वार केले. स्वत:च्या बचावासाठी त्याने हात आडवा केला असता त्याचा हातही कापला. तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दोनशे रुपयांसाठी कळमन्यात खून

दुसरी खुनाची घटना रविवारी कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती. याप्रकरणी अमन गजभिये (२५) याला कळमना पोलिसांनी अटक केली. चंदन ऊर्फ कालू राजकुमार शर्मा (२२) रा. गृहलक्ष्मी नगर, भांडेवाडी असे मृताचे नाव आहे. तो मामाकडे राहून वाढई काम करायचा. शुक्रवारपासून आईवडील चंद्रपूरला गेले होते. त्यामुळे त्याने मित्रांना बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अमन गजभिये आणि अन्य चार मित्र दारू पिण्यासाठी कालू शर्माच्या घरी आले. काही दिवसांपूर्वी कालूने अमनकडून दोनशे रुपये उधार घेतले होते. ते पैसे परत न केल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर चौघांनी कालूचा गळा चिरून खून केला. इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

मनजीतसिंग वाडेचा शोध सुरू

बॉबी माकन हत्याकांडातील आरोपी मनजीतसिंग वाडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सोमवारी मजजीतसिंग याला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आल्याची अफवा पसरली होती. पण, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी अद्याप त्याला अटक करण्यात यश आले नाही. पोलीस  त्याच्या मागावर आहेत, असे सांगितले.