28 February 2021

News Flash

वाडीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून

विक्की अर्पितवर चाकूहल्ला करणार एवढय़ात अर्पितच्या मित्रांनी चाकू हिसकावला.

प्रतिनिधीक छायाचित्र

एकजण गंभीर जखमी

नागपूर : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. विक्की अरुण चव्हाण (२३) रा. शिवाजीनगर, वाडी असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अर्पित निंभोरकर, सनी वऱ्हाडपांडे यांच्याविरुद्ध खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. विक्की चव्हाण याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यसाठी त्याला तडीपारही करण्यात आले होते. एका गुन्ह्यत तो पुण्याच्या येरवडा कारागृहातून शिक्षा भोगून परतला होता. तेव्हापासून तो वाडी परिसरात टोळी बनवण्यात गुंतला होता. रविवारी अमरावती मार्गावरील एका बारसमोर त्याच्या मित्राच्या दुचाकीला काही युवकांनी धडक दिली. या घटनेनंतर विक्की व आरोपी दोघेही घटनास्थळी पोहोचले. यावरून दोघांमध्ये भांडण व मारहाण झाली. रात्री उशिरा विक्की त्याचा मित्र अभिषेक मेहरे (२५) रा. टेकडी, वाडी याच्यासह अर्पित निंभोरकर याच्या घरी गेला. येथे विक्कीने अर्पितला मारहाण करण्यास सुरुवात केली. विक्की अर्पितवर चाकूहल्ला करणार एवढय़ात अर्पितच्या मित्रांनी चाकू हिसकावला. त्याच चाकूने विक्कीच्या छातीवर, पोटावर १२ वार केले.

या घटनेत त्याच्यासोबत असलेला अभिषेक मेहरे यावरही हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडले. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती वाडी पोलिसांना व विक्कीच्या नातेवाईकांना देण्यात आली. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासून विक्कीला मृत घोषित केले, तर अभिषेकवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाडी पोलिसांनी अर्पित निंभोरकर, सनी वऱ्हाडपांडेवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. वाडी पोलीस ठाण्यांतर्गत टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोघांमध्ये वैमनस्य

परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या कारणावरून अनेक दिवसांपासून विक्की व अर्पितमध्ये वैमनस्य होते. विक्की हा नेहमीच त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत होता. अर्पितवरही गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानेच संधी साधून विक्कीचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

विक्की विवाह उंबरठय़ावर

मृत विक्की चव्हाणचे वडील अरुण व भाऊ  सागर चव्हाण दोघेही मजुरीचे काम करतात. पुण्याच्या येरवडा जेलमधून बाहेर आल्यावर तो पुन्हा गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय झाला. त्याचा नुकताच साक्षगंध झाला असून काही दिवसांनी विवाह होता. विवाहाची तयारीही करण्यात येत होती. पण, त्यापूर्वी त्याचा खून करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 5:21 am

Web Title: notorious gangster murder in gangwar zws 70
Next Stories
1 अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी वसतिगृह कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षेचे धडे
2 बेझनबागमधील अतिक्रमण ‘जैसे थे’
3 वीज केंद्रातील राखेमुळे शेतीची राखरांगोळी
Just Now!
X