शिवीगाळ केल्याने मित्रांनीच संपवले

नागपूर : मद्यधुंद अवस्थेत घरासमोर येऊन शिवीगाळ करणाऱ्या कुख्यात गुंडाला त्याच्या मित्राने आपल्या भाचासह मिळून काठी व विटाने ठेचून  संपवले. या घटनेने धंतोली परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोघांना अटक केली.

नितीन ऊर्फ निल्या विनायक कुळमेथे (४५) रा. तकिया धंतोली असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश मधुकर सोनवणे (४७) आणि पंकज ऊर्फ कुणाल सचिन राऊत (२०) दोन्ही रा. तकिया धंतोली यांना अटक करण्यात आली आहे. नितीन हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर १९९४ ते २००९ या दरम्यान शहरातील नंदनवन, पाचपावली, कोतवाली आणि धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी आरोग्य विभागात परिचारिका असून सध्या पंढरपूर येथे सेवारत आहे. काही वर्षांपासून नितीन हा पत्नीसोबत पंढरपूर येथे राहात होता. त्याच्याविरुद्ध शहरातील न्यायालयात अनेक खटले सुरू असून नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्य़ात न्यायालयात हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाला असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तो शहरात दाखल झाला. तेव्हापासून तो तकिया धंतोलीत राहायचा. आरोपी मंगेश हा त्याचा मित्र होता. तो सट्टापट्टीचे काम करायचा. काही वर्षांपूर्वी नितीनवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी मंगेशने पोलिसांना माहिती दिली होती, असा संशय त्याला होता. तो मंगेशसोबत फिरायचा. पण, आल्यापासून तो त्याला पोलीस खबऱ्या असल्याचा संशय घ्यायचा. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नितीन हा मद्यधुंद अवस्थेत मंगेशच्या घरासमोर आला व शिवीगाळ करू लागला. मंगेशने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी मंगेशने आपला भाचा पंकज याला बोलावून घेतले व दोघांनीही मिळून त्यांनी त्याच्या डोक्यावर प्रथम काठीने वार केले. त्यानंतर विटांनी डोके ठेचून काढले.

माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद सनस हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहाय्यक आयुक्त राजेंद्र बोरावणे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.