नागपूर : चोरीचा भंडाफोड करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना खापरखेडा पोलीस हद्दीत बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रात्री  आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली.

शुभम राजेंद्र पाटील (२५), केशव ऊर्फ सोनू ओमबहादूर थापा (२२), तुषार ऊर्फ शूटर प्रमोद नारनवरे (१९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चौथा आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अश्विन शामराव ढोणे (२४) असे मृताचे नाव आहे. मृताविरुद्ध यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी काही दिवसांपूर्वी मोठी चोरी केली होती. याची माहिती अश्विनला होती. त्यामुळे अश्विन हा त्यांना धमकावून   चोरीच्या पैशात वाटा मागत होता.  पोलिसांना माहिती देईन असे धमकावून मारहाणही करायचा. या जाचाला कंटाळून आरोपींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. बुधवारी सायंकाळी आरोपींनी अश्विनला शुभमच्या घरी बोलावले. अश्विन हा त्याचा मित्र पवन इवनाते याच्यासह गेला होता. बोलत बोलत ते शिवनगर मैदानावर पोहोचले. तेथे आरोपींनी  अश्विनवर हल्ला केला.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, उपनिरीक्षक सचिन मत्ते, लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काळे, अरविंद भगत, सत्यशील कोठारे, शैलेश यादव, अमोल कुथे, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, बालाजी साखरे आणि रोहण डाखोरे यांनी आरोपींना अटक केली.