News Flash

विचार स्वातंत्र्य मिळाल्यानेच कादंबरी लिहिता आली

लिहिताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्याबाबत अनेकदा गल्लत झाल्याचेही लेखिकेने मान्य केले.

विचार स्वातंत्र्य मिळाल्यानेच कादंबरी लिहिता आली
कार्यक्रमात बोलताना शर्वरी पेठकर. व्यासपीठावर प्रा. कोमल ठाकरे, श्याम पेठकर, शैलेश पांडे,  डॉ. अरुंधती वैद्य.

लेखिका शर्वरी पेठकर हिचे प्रतिपादन

नागपूर : मनात विचार आल्यावर ते मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य सर्वानाच मिळेल असे नाही. याबाबत मात्र मी आश्वस्त होते आणि आईवडिलांकडून तो आश्वस्तपणा मिळालाही. त्यामुळेच कदाचित ही कादंबरी घडली, असे प्रतिपादन ‘तूर्तास खासगी एवढेच’ या कादंबरीच्या लेखिका शर्वरी पेठकर यांनी केले.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लेखिकेने लिहिलेल्या या कादंबरीवर विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात चर्चा आयोजित करण्यात आली. ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमात प्रा. कोमल ठाकरे व संपादक श्याम पेठकर उपस्थित होते. शाळेत घडणाऱ्या गोष्टी खरे तर खासगी होत्या. आईवडिलांसोबत बोलताना, लिहिताना अनेकदा प्रश्न पडत होते. कधीकधी लिहिताना प्रामाणिकपणा सुटायचा. मग माझ्या प्रत्येक ‘का’ला घरातून मिळालेले उत्तर आठवायचे आणि लिखाणात तो प्रामाणिकपणा परतायचा, असे शर्वरी पेठकर यांनी सांगितले. लिहिताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्याबाबत अनेकदा गल्लत झाल्याचेही लेखिकेने मान्य केले. ही कादंबरी म्हणजे एक सशक्त अभिव्यक्ती आहे, या शब्दात शैलेश पांडे यांनी कादंबरीचे कौतुक केले, पण त्याचवेळी समोर येणाऱ्या आव्हानांची जाणीवदेखील त्यांनी लेखिकेला करून दिली. नव्वद सालानंतर जन्माला आलेल्या पिढीचे शाळकरी जीवन कसे होते, या अर्थाने मी या कादंबरीकडे पाहतो. विशेष म्हणजे, या लिखाणात कोणत्याही प्रसिद्ध लेखक किंवा लेखिकेची छाप नाही. लेखिकेचे धाडस आश्वस्त करणारे आहे, असे शैलेश पांडे म्हणाले. पौगंडावस्थेतील शाळकरी मुलामुलींच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारी ही कादंबरी आहे, असे प्रतिपादन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. शर्वरी ही तिचे संचित घेऊन आली, त्यात आम्हा आईवडिलांचा वाटा नाही, असे प्रतिपादन श्याम पेठकर यांनी केले.  प्रास्ताविक डॉ. अरुंधती वैद्य यांनी व संचालन मधुरा घारपुरे-देशपांडे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2019 12:52 am

Web Title: novel was written only because of the freedom of thought writer sharvari pethkar zws 70
Next Stories
1 विदर्भातील सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित
2 सीताबर्डी उड्डाणपुलाखाली वाहनतळाच्या नावावर गुंडांकडून ‘वसुली’
3 तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर विद्यापीठाचा अन्याय
Just Now!
X