वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री चव्हाण यांची अधिकाऱ्यांना तंबी; मेयोत लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची बैठक

उपराजधानीतील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, दंत, आयुर्वेद महाविद्यालयांत यापुढे जैविक कचरा निष्काळजीपणे हाताळल्याचे आढळताच संबंधित अधिकाऱ्यांसह जैविक कचऱ्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, अशी तंबी राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. रविवारी मेयोमध्ये मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याची माहिती घेण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बैठकीला प्रामुख्याने आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, प्रकाश गजभिये, वैद्यकीय सचिव संजय देशमुख, संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर वापरलेले साहित्य, इंजक्शनच्या सिरिंग्ज, कापसाचे बोळे आणि कापलेल्या अवयवांची योग्य शास्त्रीय विल्हेवाट लावली जात नसल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी होत्या. त्याची शहनिशा करण्यासाठी ही बैठक होती. त्यात वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराला जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीत हलगर्जीपणा दिसताच दोषींवर जबाबदारी निश्चित करत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरात महापालिका, जैविक कचरा उलणारी कंपनी आणि मेयो-मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक यांनी समन्वय साधून यातून मार्ग काढावा, असा सल्ला दिला आहे. येत्या तीन महिन्यानंतर यासंदर्भात पुन्हा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंधरा दिवसांत झोननिहाय दिवसातून दोन वेळा संबंधित कंत्राटदाराने रुग्णालयातून जैविक कचरा उचलावा, त्यांच्या वाहनांवर ट्रॅकिंग व जीपीएस यंत्रणा लावावी, कचऱ्याला सिल करून त्यावर बारकोड लावावे, नागरिकांना तक्रारी करता याव्या म्हणून टोल फ्री क्रमांक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुभाष राऊत, दंतच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे राहुल वानखेडे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के.आर. सोनपुरेवै, डॉ. राजेश गोसावी, डॉ. संध्या मांजरेकर, सुपरचे डॉ. मिलिंद फुलपाटील उपस्थित होते.

बऱ्याच आमदारांची दांडी

मेयोत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचले. यावेळी अधिकारी वगळता एकही आमदार नव्हते. त्यामुळे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा सुरू केली. अध्र्या तासानंतर आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, प्रकाश गजभिये पोहोचताच बैठकीला सुरुवात झाली. नागोराव गाणार, प्रा. अनिल सोले, गिरीशचंद्र व्यास यांच्यासह आमदार डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे गैरहजर असल्याने बऱ्याच आमदारांची दांडी सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. दरम्यान, मंत्र्यांनी मेयोच्या बैठकीनंतर मेडिकलमधील ट्रॉमा युनिट आणि दंत महाविद्यालयातील बाह्य़रुग्ण विभागातील काही ठिकाणी भेट दिली. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालयात कुलरही बंद असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.