02 March 2021

News Flash

आता प्रात्यक्षिकांद्वारे पर्यावरण शिक्षण

‘युनिसेफ’सोबत अभ्यासक्रमाबाबत करार

(संग्रहित छायाचित्र)

पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, राज्य शासन तसेच युनिसेफ यांच्यात सहा ते १४ वयोगटांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गुणवत्तापूर्ण पर्यावरणविषयक शालेय अभ्यासक्रम’ तयार करण्याबाबत करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भातील शिक्षण वर्गाबाहेर व प्रात्यक्षिकांद्वारे देण्याचा प्रयत्न व्हावा, हा या मागील उद्देश आहे. ५ जून २०२१ पर्यंत अभ्यासक्रमाचे काम पूर्णत्वास जाणार आहे.

शालेय जीवनातच पर्यावरण व वातावरणीय बदलांबाबत सजगता निर्माण व्हावी, याकरिता पर्यावरण व हवामान बदल विभागमंत्री आदित्य ठाकरे यांनी  पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाला पर्यावरणक्षेत्रातील विविध सहयोगी स्वयंसेवी संस्था सहकार्य करणार आहेत. याबाबत नुकतीच सह्य़ाद्री अतिथीगृह येथे पर्यावरणीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेला पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, युनिसेफ मुंबईच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंचमहाभूतांचे रक्षण करून पर्यावरणाचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीची सुरुवात म्हणजे ‘माझी वसुंधरा’ अभियान आहे. टाळेबंदीच्या काळात जसे स्वच्छ समुद्र, निरभ्र आकाश दिसत होते, तसेच ते कायमस्वरूपी होणे गरजेचे आहे. युनिसेफसोबत सहकार्य करीत असताना फक्त अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या आत कोंडण्यापेक्षा पर्यावरण किंवा वातावरणीय बदलांबाबतचे शिक्षण त्यांना वर्गाबाहेर व प्रात्यक्षिक स्वरूपात देण्याचा प्रयत्न व्हावा. यात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आदी उपक्र मांत विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

विविध घटकांचे एकत्रीकरण

पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंबंधी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रभावी उपाययोजना अमलात आणण्यासाठी व सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासोबत पर्यावरण शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विविध घटकांचे एकत्रीकरण करण्याचे काम या कराराच्या माध्यमातून केले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 12:17 am

Web Title: now environmental education through demonstrations abn 97
Next Stories
1 रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रात्रपाळी भत्त्यालाही कात्री
2 करोना चाचण्यांसाठी नागपूरकरांची खासगी प्रयोगशाळांना पसंती
3 रेकॉर्ड ब्रेक! नितीन गडकरींचा विक्रमही अभिजित वंजारींनी मोडला
Just Now!
X