नागपूर पोलिसांचे महत्त्वपूर्ण नवीन ‘अॅप’
*  एका क्लिकवर गुन्हेगारांची माहिती मिळणार

सर्रासपणे समाजात वावरणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्यांपैकी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिसाकडे गुन्हेगारांचा लेखाजोखा असणे आवश्यक आहे. मात्र, ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. आता मात्र असे होणार नाही. कारण, नागपूर पोलीस आयुक्तालयाने एका क्लिकवर गुन्हेगारांचा लेखाजोखा उपलब्ध होईल, असे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोलिसाच्या स्मार्टफोनमध्ये गुन्हेगारांचा इतिहास असणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात. परंतु त्यावेळी पोलिसांकडे ती व्यक्ती कोण, याची माहिती उपलब्ध नसते. अनेकदा वाहतूक पोलिसांना दंड देणारे हे दारू, शस्त्रास्त्रे, वन्यजीव तस्कर असल्याचे नंतर समजते. शिवाय विविध गुन्ह्य़ांमधील फरार आरोपी, रजेवर कारागृहाबाहेर आलेले आणि फरार झालेले कैदी शोधण्यासाठी पोलिसांना प्रचंड मेहनत करावी लागते. संबंधित पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पोलिसांकडेच त्याचा लेखाजोखा असल्याने संपूर्ण शहरातील पोलीस अशा गुन्हेगारांपासून अनभिज्ञ असतात. मात्र, वाहतूक पोलिसांपासून ते बंदोबस्तातील सुरक्षारक्षकांपर्यंत सर्व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध असल्यास सर्वाजनिक ठिकाणी गुंडांचा वावर कमी होईल. शिवाय विविध गुन्ह्य़ात आवश्यक असणारी व्यक्ती पकडण्यासाठी आता पोलिसांना स्मार्टपरिश्रम घ्यावे लागतील. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तालयाने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने ‘मोबाईल अ‍ॅप’ तयार केले आहे. त्यात नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, त्यांच्याविरुद्ध दाखल असलेले गुन्हे, छायाचित्र, जामीन आहे किंवा नाही, जातमुचलका आदी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईपासून ते खून, दरोडा, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. एक गुन्हा दाखल असलेली व्यक्तीही पोलिसांच्या नोंदीत आहे. ही सर्व माहिती अ‍ॅपद्वारे शहर पोलिसांच्या मोबाईलवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक पोलीसच तपास अधिकारी असेल

या अ‍ॅपद्वारे प्रत्येक पोलिसाच्या स्मार्टफोनमध्ये गुन्हेगारांचा लेखाजोखा असेल. वाहतूक शिपायापासून ते बंदोबस्तातील प्रत्येक अधिकारी नियमांचे उल्लंघन करणारे, संशयितांना थांबविल्यानंतर त्यांच्याकडे ओळखपत्राच्या माहितीवरून त्याची काही गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे का? हे तपासतील. जर संबंधितांविरुद्ध गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्यास त्याला ताब्यात घेतील आणि वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसारच पुढील कारवाई करतील. यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचारी जवळपास तपास अधिकारीच असेल. अ‍ॅपची सध्या चाचणी सुरू असून जवळपास महिनाभरात अ‍ॅप प्रत्येक पोलिसांच्या मोबाईलमध्ये असेल.

– रंजनकुमार शर्मा, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, गुन्हे शाखा.

अ‍ॅप’ची चाचणी सुरू

तयार करण्यात आलेले हे अ‍ॅप गुन्हे शाखेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये टाकण्यात आले असून त्याची चाचणी सुरू आहे. या काळात अ‍ॅपमध्ये आणखी फीचर्स देण्याची आवश्यकता आहे का? काय त्रुटी आहेत, हे तपासण्यात येत आहे. त्यानंतर अ‍ॅपमध्ये तशा सुधारणा करण्यात येतील आणि प्रत्येक पोलिसाला बक्कल क्रमांकानुसार हे अ‍ॅप त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून देण्यात येणार आहे.

राज्यातील पहिलाच प्रयोग!

गुन्हेगारांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी प्रत्येक आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयात वाचन शाखा असते. या शाखेत सर्व गुन्हेगार, गुन्हे आदींची माहिती असते. तर प्रत्येक पोलीस ठाण्यांकडे त्या क्षेत्रातील गुन्हेगारांची माहिती असते. परंतु संपूर्ण शहरातील आणि आपल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची माहिती कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे नसते. त्यामुळे तपासावेळी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला वाचन शाखेशी संपर्क करावा लागतो. शिवाय ही माहिती उपलब्ध होण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे आता प्रत्येक पोलिसांकडे सर्व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध असल्यास कारवाई गतिमान होईल. अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती उपलब्ध असण्याची यंत्रणा, राज्यात कुठे असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे नागपुरातील हा प्रयोग राज्यात पहिलाच असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.