राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निकषांना न जुमानता महाविद्यालयांच्या हमीपत्रांवर विद्यापीठांच्या स्थानिक चौकशी समित्या (एलईसी) संलग्निकरण देत राहिल्याने गुणवत्तायुक्त शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. म्हणून विद्यार्थी हितासाठी शासनाने राज्यातील सर्व बी.एड., एम.एड., बी.पी.एड. आणि एम.पी.एड. महाविद्यालयांचे मूल्यांकन आरंभून एकप्रकारे विद्यापीठांच्या एलईसीवर अविश्वास दाखवला आहे.

राज्यभरातील ९९ टक्के महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वानवा, ग्रंथालय, वर्गखोल्या, प्रसाधनगृह नसणे, अशा अभावग्रस्ततेत विद्यार्थी शिकत आहेत. एलईसींनी एकेका महाविद्यालयाकडून दहादा हमीपत्र घेऊन त्यांना संलग्निकरण दिले. यावर विद्यापीठाच्या विधिसभा, विद्वत परिषदेत नेहमीच चर्चा होऊन सदस्यांमध्ये खडाजंगी झालेली आहे. मात्र, महाविद्यालयांसाठी आवश्यक अटींची पूर्तता केली गेली नाही. वर्षांनुवर्षे असेच होत असल्याने यावेळी राज्य शासनाने या शारीरिक व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमास शासनाचे सुधारित ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचे आदेश काढले असून त्यासाठी शिक्षण संचालनालयाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे.

शिक्षकवर्ग पुरेसे नसतानाही एनसीटीईने विहित केलेल्या शिक्षकीय पदांच्या आकृतीबंधाची पूर्तता केली नसताना विद्यापीठाने या शिफारशी केल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित करून विद्यार्थी हितासाठी या संस्थांच्या सर्व निकषांची तपासणी सहसंचालक कार्यालयांमार्फत आरंभली आहे. सहसंचालक कार्यालयाने त्या त्या भागातील महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी तपासणी करण्याचे धोरण स्वीकारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत, तसेच एकच शिक्षक व प्राचार्य वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये दाखवला जाऊ नये म्हणून यावेळी तयार अर्जामध्ये त्यांची छायाचित्रेही मागवली आहेत.

नागपूर विभागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ आणि रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाचा समावेश होतो. बी.एड., एम.एड., बी.पीएड., आणि एम.एड. सर्वात जास्त महाविद्यालये नागपूर विद्यापीठाला, तर गोंडवाना विद्यापीठाला ४१ महाविद्यालये आणि उर्वरित महाविद्यालये संस्कृत विद्यापीठाला संलग्नित आहेत. अशा एकूण २०४ महाविद्यालयांचे मूल्यांकन एनसीटीईच्या निकषानुसार सहसंचालक कार्यालय करीत आहे. त्यात औरंगबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला १६, जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ३०, अमरावतीच्या संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाला ४४, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ८०, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला २३, सोलापूर विद्यापीठाला ७, स्वामी रामानंद सरस्वती मराठवाडा विद्यापीठाला ९ आणि मुंबई विद्यापीठाला ४५ महाविद्यालये संलग्नित आहेत.

पायाभूत सुविधांचाच अभाव

नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारीत पाच अनुदानित पदवी शिक्षणशास्त्र महाविद्यालये आहेत. पदवी शारीरिक शिक्षणशास्त्राचे चार अनुदानित महाविद्यालये आहेत. विद्यापीठ संचालित बॅ. वानखेडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि भंडाऱ्याचे शासकीय शिक्षण महाविद्यालय सोडल्यास बाकी कायम विना अनुदानित महाविद्यालये आहेत. एक-दोन महाविद्यालये वगळता बाकी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे.