मागणी झाल्यास प्रतिमा लागणार

राष्ट्रपुरुषांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांमध्ये लावल्या जातात. याच परंपरेत आता ग्रामगीतेतून ग्रामीण ग्रामविकासाचा संदेश देणारे व आपल्या भजनातून राष्ट्रभक्ती जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचीही प्रतिमा लावण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मागणी झाल्यास सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात यापुढे राष्ट्रसंतांची प्रतिमा लावता येणार आहे.

राष्ट्रसंतांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे, विदर्भात त्यांची संख्या मोठी आहे, राष्ट्रसंतांच्या नावाने नागपूर विद्यापीठही आहे. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान तसेच ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला ग्रामविकासाचा संदेश याही काळात सुसंगत ठरला आहे. राष्ट्रसंतांनी त्यांच्या ग्रामगीतेतून आणि भजनातून घर, गाव, राष्ट्र कसे असावे याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. गावाचा विकास झाला तर शहराचा होईल व नंतर राष्ट्र संपन्न होईल, असा संदेश त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, १९४२ च्या स्वातंत्र्य लढय़ात महाराजांचे योगदान मोठे होते. चिमूर-आष्टी, यावली (शहीद) येथे इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाची प्रेरणा राष्ट्रसंतांच्या भजनातून मिळाली होती. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. शासनाने अधिकृतपणे याबाबत निर्णय घेतला नसला तरी राष्ट्रसंतांप्रती असलेल्या आदरापोटी काही कार्यालयांमध्ये त्यांची प्रतिमाही लावण्यात येत होती, पण त्यावर शासकीय मोहोर लागली नव्हती. राज्य शासनाने अनेक वर्षांपासूनची गुरुदेव सेवा भक्तांची मागणी आता पूर्ण केली असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १२ जुलैला यासंदर्भात रितसर आदेश जारी केले आहेत. या निर्णयांचा गुरुदेव सेवा मंडळाच्या लाखो भक्तांनी स्वागत केले आहे. सरकार बदलले की सरकारी कार्यालयातील राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमांमध्येही बदल होतो. जुन्या अडगळीत जातात व त्याची जागा नवीन प्रतिमा घेते. यातून नवे वादही निर्माण होतात. राष्ट्रसंतांचे व्यक्तिमत्त्व हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही तर त्यांना मानणारा वर्ग हा सर्वपक्षीय आहे, हे येथे उल्लेखनीय.

शासनाने प्रतिमा निश्चित करावी

राष्ट्रपुरुषांची प्रतिमा ही प्रेरणा देणारी असते, पूजा करायची नसते, राष्ट्रसंत हे चमत्कार करणारे बाबा नव्हते तर ते थोर विचारवंतही होते. सध्या बाजारात राष्ट्रसंतांच्या वेगवेगळ्या प्रतिमा उपलब्ध आहेत. त्यापैकी काही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला छेद देणाऱ्या आहेत. शासनाने परवानगी दिल्याने त्यांचे भक्त कोणतीही प्रतिमा लावतील. तसे होऊ नये म्हणून आणि त्यांच्या प्रतिमेतून कायमस्वरूपी प्रेरणा मिळत राहावी, म्हणून शासनानेच एक निश्चित त्यांची प्रतिमा ठरवून द्यावी व तीच सर्व शासकीय कार्यालयात लावण्यात यावी, ही गुरुदेव सेवा मंडळाची मागणी आहे.

– ज्ञानेश्वर रक्षक, ज्येष्ठ प्रचारक, गुरुदेव सेवा मंडळ