२०१६ च्या आशियाई स्पर्धेत मी कांस्यपदक पटकावले तर २०१८ मध्ये चीन हायिनग आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे मला आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. २०१९ मध्ये बार्सीलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी  वेग वाढवण्याचा निर्धार नागपूरचा आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू निखिलेश तभाणेने व्यक्त केला आहे.

स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित राष्ट्रीय खेळ दिवसानिमित्त सत्कार समारंभानंतर पत्रकारांशी झालेल्या वर्तालाप कार्यक्रमादरम्यान तो बोलत होता. निखिलेश म्हणाला, चीनला झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५०० मीटर डी-स्प्रींट स्केटिंग प्रकारात केवळ अध्र्या सेकंदाने रौप्य तर एका सेकंदाने सुवर्णपदक हुकले. २०१६च्या आशियाई स्पर्धेतही मायक्रोसेकंदाने माझे सुवर्णपदक हुकले. त्यानंतर दोन वर्षे दुखापतीमुळे स्पर्धेत भाग घेतला आला नाही. मात्र २०१९ मध्ये ७ ते १५ जुल दरम्यान होणाऱ्या बार्सीलोना वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. दररोज सकाळ-सायंकाळ ३ तास सराव सुरू असून अधिक गती कशी वाढवता येईल, यावर भर आहे. जागतिक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी १८ ते २५ डिसेंबर दरम्यान विशाखापटणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पहिले किंवा दुसरे स्थान पटकावे लागेल, असेही निखिलेशने सांगितले.

नागपूर का सोडले

नागपूरात एनआयटीची आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटिंग रिंकवर आधुनिक सुविधा नाहीत. रिंकवरील सिंथेटिक लेअर खराब झाली आहे. त्यामुळे कामगिरीवर परिणाम होतो. दुरुस्तीसाठी केवळ पाच ते सात लाखाचा खर्च अपेक्षित असून नागपूर सुधार प्रण्यास आणि महापालिका त्याकडे लक्ष देत नाही. तसेच मुंबई माझ्यासाठी भाग्यशाली  ठरली. तेथील रिकवर योग्य सराव होत नसल्याने मी मुंबईच्या विरार येथील रिगवर प्रशिक्षण आणि सरावाला सुरुवात केली आणि त्याचा भक्कम फायदा झाला. राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मी सलग तीन वर्षे सुवर्णपदक पटकावले आणि त्याच कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकलो. तसेच स्थानिक स्केटिंग संघटनेतही बराच वाद आहे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपसी हेवे दावे विसरून शहरात स्केटिंग कसे वाढेल आणि नव्या दमाच्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक आणि मार्गदर्शक कसे मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही निखिलेश म्हणाला.

खेळाडूंच्या रोजगाराकडे दुर्लक्ष 

स्केटिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. आशियाई स्पर्धेतही भारतासाठी कांस्यपदक मिळवून दिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार माझ्या कामगिरीकडे दुर्लक्ष करीत आहे. पदक प्राप्त झाल्यावर मी सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतो. त्यासंदर्भात मी अनेकदा राज्य शासनाकडे विचारणा केली. मात्र काहीच उत्तर मिळाले नाही. तसेच भारतासाठी कांस्यपदक विजेत्यांना सरकारकडून दीड लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते ते देखील मला दोन वर्षांपासून मिळालेले नाही. इतर राज्यात मात्र खेळाडूंना नोकरी आणि बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे देशासाठी पदक मिळवून दिल्यावरही रोजगार आणि बक्षीस मिळत नसेल तर पदके मिळवून करायचे काय? असा सवाल निखिलेशने केला आहे.