पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. २८ ऑक्टोबरला एकूण बाधितांमध्ये पन्नाशी ओलांडलेले ३३.६२ टक्के रुग्ण होते, ते ५ डिसेंबरला ३३.९२ टक्के नोंदवले गेले.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, राज्यात २८ ऑक्टोबपर्यंत करोनाचे १६ लाख ५० हजार ९४२ रुग्ण होते. त्यातील ५ लाख ५५ हजार ७८ रुग्ण (३३.६२ टक्के) हे वयाची पन्नाशी ओलांडलेले होते. एकूण रुग्णांतील ५१ ते ६० वयोगटांत पन्नाशीनंतरचे सर्वाधिक १६.०१ टक्के रुग्ण होते. तर १२ नोव्हेंबपर्यंत राज्यात बाधितांची संख्या वाढून १७ लाख २८ हजार ९२४ वर पोहोचली. त्यात पन्नाशीनंतरच्या ५ लाख ८२ हजार ६६९ रुग्णांचा (३३.७० टक्के) समावेश होता. त्यात ५१ ते ६० वयोगटांतील १६.०२ टक्के रुग्ण होते.

५ डिसेंबपर्यंत राज्यात करोनाचे रुग्ण वाढून संख्या १८ लाख ३९ हजार ९१३ वर पोहचली. या रुग्णांत ५० ते ११० वयापर्यंतच्या ६ लाख २४ हजार २२५ (३३.९२ टक्के) रुग्णांचा समावेश होता. एकूण रुग्णांत ५१ ते ६० वयोगटांतील १६.१२ टक्के रुग्ण होते. त्यामुळे सातत्याने पन्नाशीनंतरच्या रुग्णांच्या प्रमाणात टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असताना किंचित वाढताना दिसत आहे.

अधिक काळजी घेण्याची गरज

वृद्ध करोनाबाधित जोखमीच्या गटात मोडत असून या आजाराने दगावणाऱ्यांत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय, मूत्रपिंडासह वृद्ध असलेल्यांचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुटुंबाने वृद्धांना करोनापासून वाचवण्यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.