यंदा केवळ ३० टक्के विक्री

नागपूर : जानेवारी महिन्यात नागपूरच्या आकाशात पतंग उडताना दिसते. ‘ओकाट’ आणि ‘ओपार’ च्या आरोळ्या ऐकू येतात. मात्र यंदा मकरसंक्रांतीच्या महिन्यात पतंग बाजाराला नायलॉनच्या मांजाचा फटका बसला. या मांजामुळे होणारे अपघात लक्षात घेता अनेकांनी मुलांना पतंग उडवूच दिली नाही.

नागपुरात मकरसंक्रांत पतंगच्या शौकिनांसाठी प्रसिद्ध आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ापासून पतंग बाजारात खरेदीची लगबग सुरू होते. मात्र, यंदा बाजारात विशेष पतंग विकल्या गेल्या नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे नायलॉन मांजावर घातलेली बंदी. न तुटणाऱ्या नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले होते. मात्र, पेचा खेळताना नागपूरकरांना नायलॉन मांजाच हवा असतो. मात्र त्यावर बंदी असल्याने यंदा बाजारात मांजासोबतच पतंग कमी उचल झाली. सक्करदरा, जुनी शुक्रवारी, महाल,तांडापेठ, हसनबाग, बेझनबाग, जुना बाबुळखेडा या ठिकाणी पंतगचे आणि मांजा तयार करण्याचे कारखाने असून वर्षभर हाच उद्योग ते चालवतात. नागपुरात पतंगची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. एका महिन्यात वेगवेगळ्या आकारातील ३ ते ४ हजार पतंग तयार करतात. बाजारात अग्नी, संखल आठ, महासंखल आठ, एके ५६, गेंडा, हातोडा, कलिंगडा, संखल अशा नावाचे मांजा विक्रीला आले आहे.

दुकांनामधील फिरक्यावर चमकणारे लाल, गुलाबी, निळा, पिवळा असे विविध रंग सर्वाना आकर्षित करीत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मांजाच्या किंमतीत वाढ  झाली आहे. मांजामध्ये ४० पेक्षा अधिक प्रकार आहे. एका चकरीमध्ये ५ ते ६ रीळ मांजा असून २५० ते ३०० रुपयाला त्याची विक्री केली जाते. बरेली आणि संखलच्या मांजाचा दर्जा चांगला असल्यामुळे तो महाग आहे. विविध आकारातील रंगीबेरंगी पतंग ५ रुपयापासून ३०० रुपयांपर्यंत विक्रीला होत्या. संक्रांतीच्या दिवशी सर्वाधिक पतंग विकल्या जातात. त्याच दिवशी यंदा व्यवसायाने मार खाल्ला, असे विक्रेते सांगतात.

यंदा मकरसंक्रांतील व्यवसायात मंदी होती. सत्तर टक्के माल शिल्लक आहे. गेल्या पंधता दिवसात केवळ तीस टक्के माल विकला गेला आहे. नायलॉन मांज्याची मागणी कायम आहे. मात्र, त्याच्या विक्रीवर बंदी असल्याने ग्राहक केवळ विचारणा करून परत जात आहेत.

– जितेंद्र, पतंग व्यावसायिक जुनी शुक्रवारी