|| महेश बोकडे

वैद्यकीय क्षेत्रातील निष्कर्ष

जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी किंवा अधिक असल्यास त्याला तरुणपणी लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही गैर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. उपराजधानीतील  ४२७ जणांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला.

डायबेटिज केयर अ‍ॅणड रिसर्च सेंटरने मधुमेहाच्या टाईप- १ या श्रेणीत न मोडणाऱ्या पण इंन्सुलीनची गरज असलेल्या ४६० मधुमेह  झालेल्यांची आरोग्यविषयक माहिती घेतली.  यापैकी बहुतांश हे तरुण व लठ्ठ होते.  यापैकी २४२ जणांचे वजन जन्माच्या वेळी कमी होते. त्यानंतर ते वाढल्याचे दिसून आले. तसेच घरी प्रसूती झालेल्या महिलेच्या बाळांमध्ये लठ्ठपणासह गैरसंसर्गजन्य आजाराचे प्रमाण सर्वाधिक आढळल्याचे यासंदर्भात केलेल्या अभ्यासातून दिसून आले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतातील विविध वैद्यकीय संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतात जन्मणाऱ्या बाळाचे वजन हे २.५० किलो ते ३.५० किलोच्या दरम्यान सामान्य मानले जाते. पश्चिमात्य देशांमध्ये  बाळाचे चार किलो वजन हे सामान्य मानले जाते.

कमी वजनाचे बाळे जन्मल्यास त्याला जास्त खाऊ घातल्या जाते. नंतरच्या काळात बाळाच्या वाढणाऱ्या वजना मागे हे सुद्धा एक कारण ठरते. या मुलांना भविष्यात मधुमेह, उच्चरक्तदाबासह गैरसंसर्गजन्य आजाराची जोखीम जास्त असते. तर जन्माच्या वेळी क्षमतेहून जास्त वजन असलेल्या मुलाच्या शरीरात इंन्सुलीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही मुलेही तरुणावस्थेत लठ्ठ होण्याची जोखीम जास्त असते.

मुलींचे प्रमाण अधिक

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात कमी वजन घेऊन जन्मणाऱ्या बाळांचे प्रमाण हे १६ टक्के आहे, तर भारतात हे प्रमाण २० टक्के आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांनी त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो.

‘‘ बाळ जन्मत: सरासरी वजनाचे असावे. ते कमी किंवा अधिक असले  तरी  भविष्यात त्याला लठ्ठपणा, मधुमेह आणि इतरही आजार होण्याची शक्यता सामान्य वजनाच्या बाळाच्या तुलनेत अधिक असते. ’’      – डॉ. सुनील गुप्ता, डायबेटिज केयर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, नागपूर.