|| महेश बोकडे

शासकीय दंत महाविद्यालयाच्या अभ्यासातील निरीक्षण

नागपूर: शालेय विद्यार्थ्यांमध्ये फास्ट फूड, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. शासकीय  दंत महाविद्यालय व रुग्णालयांतील डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार सामान्यांच्या तुलनेत फास्ट फूड खाणाऱ्या मुलांमध्ये दातांशी संबंधित आजाराचे प्रमाण पाचपट आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहारावर लक्ष न दिल्यास भविष्यात मुलांना दातांच्या गंभीर आजारांना समोर जावे लागू शकते.

दंत रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात वर्षांला ८० ते ९० हजार रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी सुमारे ४० टक्केच्या जवळपास (३२ ते ४२ हजार) रुग्ण हे कमी वयाचे म्हणजेच विद्यार्थी किंवा मुले या संवर्गातील असतात. त्यांच्या दातांना कीड लागणे व हिरडय़ांशी संबंधित आजाराचेही प्रमाण जास्त असते. येथील डॉक्टर  रुग्णांचा आरोग्य इतिहास जाणून घेत असतात. त्यानुसार, ८० ते ८५ टक्के मुले फास्ट फूड किंवा जंक फूडचे सेवन कमी-अधिक प्रमाणात करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पदार्थ आठवडय़ात तीन दिवसांहून अधिक खानाऱ्यांमध्ये दातांच्या आजाराची समस्या अधिक आहे. जास्तच लहान मुलांच्या दातांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यावर पिवळ्या व कथ्या रंगाचे डाग येतात. ७० ते ८० टक्के बालकांकडून  दिवसांत  एकदाही योग्य पद्धतीने ब्रश केले जात नाही. त्यामुळे या बालकांचे दातांचे आजार वाढतात.

दातांच्या आजाराची कारणे

फास्ट, आणि जंक फूड तयार करणाऱ्या अनेक विक्रेत्यांकडून हल्ली कृत्रिम चव, रंगाचा वापर होतो. त्यातील हानीकारक रसायने दात व चिटकतात. ते जास्त काळ राहिल्यास तेथे कीड लागते, दातांचा पांढरा रंग बदलून तेथे पिवळ्या आणि कथ्या रंगाचे डाग पडतात. हे दातांवर चिटकतात.  दीर्घकाळ हे पदार्थ तेथेच राहिल्याने दात व हिरडय़ांचे आजार होतात.

‘‘मुलांचे दात नाजूक असतात. फास्ट फूड आणि जंकफूडमधील घातक रसायन, या पदार्थातील चिकट वस्तू दातांच्या फटीत अडकल्याने बालकांचे दात व हिरडय़ांचे आजार वाढत आहेत. या आजारापासून वाचवण्यासाठी पालकांनी त्यांना हे खाद्य कमी द्यावे. सोबत रोज दिवसांत दोन वेळा नित्याने योग्य पद्धतीने ब्रश करायला लावावे.’’ – डॉ. वैभव कारेमोरे, विभागप्रमुख, दंत शास्त्र विभाग.