|| महेश बोकडे

नागपूर महापालिकेकडून रुग्णालयांवर दबाव

नागपूर : उपराजधानीत करोनाचा प्रभाव ओसरत असून आता रोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्याही तीनशेहून खाली गेली आहे. परंतु, याचवेळी गैरकरोनाचे गंभीर रुग्ण वाढत आहेत. गैरकरोनाचे रुग्ण वाढत असतानाही  खासगी रुग्णालयातील करोनासाठी आरक्षित रुग्णशय्या इतर रुग्णांसाठी वर्ग करण्याबाबत महापालिका आडकाठी आणत असल्याचा आरोप रुग्णालयांकडून करण्यात आला आहे.

नागपुरात करोनाचे रुग्ण वाढल्यावर महापालिका आणि जिल्हा प्रशासाने मेडिकल आणि एम्स या रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांत रुग्णशय्या वाढवून घेतल्या. त्याला शहरातील लहान-मोठ्या सर्वच खासगी रुग्णालयांनी प्रतिसादही दिला. त्यामुळे १३ मे २०२१ पर्यंत शहरात करोनासाठी ७ हजार ७४५ रुग्णशय्या आरक्षित झाल्या. एकूण रुग्णशय्यांमध्ये प्राणवायूच्या ४ हजार ८६५, अतिदक्षता विभागाच्या २ हजार २७४, जीवनरक्षण प्रणालीच्या ५८१ रुग्णशय्यांचा समावेश होता. आता करोनाचा प्रभाव ओसरत आहे. त्यामुळे सर्वच खासगी रुग्णालयांतील करोनासाठी आरक्षित रुग्णशय्या बऱ्यापैकी रिक्त आहेत. त्यातच आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिस (काळी बुरशी), करोना पश्चात समस्या असलेले श्वसन, यकृतासह इतर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. परंतु,  हे गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात  आल्यावर करोनाच्या आरक्षित रुग्णशय्यांमुळे त्यांना उपचारात अडचणी येत आहेत. त्यातच महापालिका प्रशासनाने  खासगी रुग्णालयांना करोनाच्या निश्चित खाटा आरक्षित ठेवाव्याच लागतील, असे स्पष्ट केले आहे. त्यावर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनकडून आक्षेप घेतला जात  आहे.

नागपुरात लहान-मोठे ६५० खासगी रुग्णालये असून तेथे दहा हजारांवर खाटा आहेत. यापैकी बहुतांश रुग्णालयांनी करोना काळात  खाटा वाढवून उपचारासाठी पूर्ण मदत केली. आता येथे करोनाचे रुग्ण कमी होऊन गैरकरोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोनासाठी रुग्णशय्या आरक्षित असल्याने इतर रुग्णांना  त्रास होत आहे. त्यामुळे या रुग्णशय्या गैरकरोनात वर्ग कराव्या. रुग्ण वाढल्यास पुन्हा या रुग्णशय्या करोनासाठी वर्ग करता येऊ शकतात. – डॉ. अनुप मरार, समन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन, नागपूर.

‘‘करोनासाठी आरक्षित रुग्णशय्या गैरकरोनात वर्ग करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. परंतु खासगी रुग्णालयांत गैरकरोनाचे रुग्ण आल्यास रुग्णालय त्यांच्यावर उपचार करू शकते. शेवटी प्रत्येक रुग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे.’’ – राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका.