गिट्टीखदान चौकातील घटना
पोलीस हवालदार वृद्ध आईला दुचाकीवरून खासगी रुग्णालयात घेऊन जाताना गिट्टीखदान चौक परिसरात एका अज्ञात चारचाकी वाहनाची जोरदार धडक लागली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान हवालदाराच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला असून जखमी हवालदारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वेणुबाई वामनराव बोंदरे (६९) राहणार फलके ले- आऊट, काटोल मार्ग असे मृत महिलेचे नाव आहे. अशोक वामनराव बोंदरे (५६) असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. अशोक बोंदरे हे १७ जुलैच्या संध्याकाळी दुचाकीने (एमएच- ३१, एक्यू- ३००१) आईला सदर येथील रुग्णालयात नेत होते. गिट्टीखदान चौक परिसरात एका भरधाव चारचाकी वाहनाची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक लागली. त्यात वाहनासह दोघेही खाली पडले. अशोक बोंदरे यांच्या छाती व कपाळावर तर त्यांच्या आईच्या डोक्यावर गंभीर मार लागला होता. रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांना मेडिट्रीना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान १७ जुलै रोजी वेणुबाई बोंदरे यांचा मृत्यू झाला. तर जखमी अशोक बोंदरे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. निखील अशोक बोंदरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.