आतापर्यंत शहर, ग्रामीण व एसआरपीएफच्या ७२६ जणांना बाधा

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत  आहे. यातून एकही वर्ग सुटलेला नाही. पण, रुग्णालयात उपचार करणाऱ्यांपेक्षा लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना करोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहर पोलीस, नागपूर ग्रामीण आणि एसआरपीएफमधील ७२६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून पोलिसांनी लोकांची सुरक्षा करताना स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलीस विभागातून प्राप्त आकडेवारीनुसार, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) येथे कार्यरत असलेल्या ७२६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काहींचा मृत्यूही झाला आहे.   प्रशासनानेही पोलीस विभागाकडे दुर्लक्ष न करता त्यांना मास्क, सॅनिटायझर, संवेदनशील ठिकाणी सेवा देणाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीए किट) उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

एसआरपीएफमध्ये ३२९ जवानांना करोना

नागपूर शहरात असलेल्या एसआरपीएफ ग्रुप-४ येथील १६७ जवानांना करोनाची लागण झाली. त्यात सहा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ३० जण उपचार घेऊन बरे झाले.  नागपुरातीलच पण सध्या गडचिरोली वडसा येथे कार्यरत ग्रुप १३ चे १४७ जवानांना करोना झाला असून १० जण करोनामुक्त झाले. गोंदियातील ग्रुप-१५ मध्ये १५ जणांना करोनाची लागण झाली व ते उपचारानंतर बरे झाले. यासंदर्भात एसआरपीएफ नागपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक महेश घुये यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी एसआरपीएफमधील जवान मोठय़ा संख्येने बरे होत असून इतरांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

शहर व ग्रामीणमध्ये ३९७ जणांना बाधा

शहर पोलीस आयुक्तालयात ३३७ पोलिसांना करोना झाला आहे. त्यात १८ पोलीस अधिकारी, १७३ पोलीस कर्मचारी आणि १४६ त्यांच्या कुटुबीयांचा समावेश आहे. त्याशिवाय नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत आतापर्यंत ६० जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.